वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या खेलो इंडिया 21 वर्षांखालील वयोगटाच्या महिला लीग हॉकी स्पर्धेत इंडिया ज्युनियर्स संघाने सलग पाचवा विजय नोंदवून अ गटात आघाडीचे स्थान मिळविले आहे. इंडिया ज्युनियर्स संघाने ओडिशा नवल टाटा हॉकी संघाचा 8-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.
या स्पर्धेतील सोमवारी झालेल्या अ गटातील सामन्यात इंडिया ज्युनियर्स संघातील आघाडीफळीत खेळणाऱया दीपिका आणि मुमताज खान यांनी पाच गोल नोंदविले. या स्पर्धेत दीपिकाने आतापर्यंत पाच सामन्यांत 13 गोल तर मुमताज खानने पाच सामन्यात 11 गोल नोंदविले आहेत. इंडिया ज्युनियर्स संघाने पाच सामन्यातून 15 गुणांसह अ गटात आघाडीचे स्थान मिळविताना एकूण 40 गोल नोंदविले आहेत. इंडिया ज्युनियर्स संघाने यापूर्वीच्या सामन्यात मुंबई स्कूल्स स्पोर्टस् असोसिएशन संघाचा 5-0 असा पराभव केला होता. साई ब संघाने पाच सामन्यांतून 13 गुणांसह दुसरे स्थान पटकाविले आहे. त्यांनी चार सामने जिंकले असून एक सामना बरोबरीत राखला आहे. ब गटातील झालेल्या सामन्यात साई अ संघाला भोपाळच्या मध्यप्रदेश हॉकी अकादमीने गोलशून्य बरोबरीत रोखले. ब गटात सोनीपतचा हर हॉकी अकादमी आघाडीवर आहेत. 14 संघांचा सहभाग असलेल्या या लीग स्पर्धेत आतापर्यंतच्या 34 सामन्यातील हा पहिला गोलशून्य बरोबरीतील सामना नोंदविला गेला.









