वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथील इंदिरा गांधी स्टेडियमच्या संकुलामध्ये 16 ते 21 जानेवारी दरम्यान होणाऱ्या योनेक्स-सनराईज पुरस्कृत इंडिया खुल्या सुपर 750 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय पुरूष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला. भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय आणि लक्ष्य सेन यांना मात्र हा ड्रॉ फायदेशीर ठरला आहे.
2024 च्या पॅरीस ऑलिंम्पिक स्पर्धेच्या दृष्टीकोनातून भारतीय बॅडमिंटनपटूंना इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अधिक गुण मिळविण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. नवी दिल्लीत होणाऱ्या या स्पर्धेत पुरूष दुहेरीतील अव्वल जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष राहिले आहे. जागतिक मानांकनात ही जोडी पुन्हा अग्रस्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. या जोडीने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. किदांबी श्रीकांत, लक्ष्य सेन आणि प्रियांशू राजवत हे भारताचे प्रमुख बॅडमिंटनपटू राहतील. या स्पर्धेतील पुरूष एकेरीचा सलामीचा सामना लक्ष्य सेन आणि राजवत यांच्यात होणार असून त्यानंतर प्रणॉयचा सलामीचा सामना चीन तैपैयीच्या चेन बरोबर होणार आहे. पुरूष एकेरीच्या मानांकनात श्रीकांत सध्या 24 व्या स्थानावर आहे. श्रीकांतचा या स्पर्धेतील पहिला सामना हाँगकाँगच्या ली चेयुकशी होणार आहे. पुरूष दुहेरीत सात्त्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचा सलामीचा सामना तैपैयीच्या फेंग ली आणि फेंग ची ली यांच्या बरोबर होईल. महिला दुहेरीत भारताची अश्विनी पोनाप्पा आणि तनिषा क्रेस्टो त्याचप्रमाणे ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद हे ऑलिंम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत.









