वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडिया खुल्या सुपर 500 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा येथे 11 ते 16 मे दरम्यान आयोजित केली असून ऑलिंपिक चॅम्पियन कॅरोलिना मारीन आणि टॉप सीडेड केन्टो मोमोटा हे प्रमुख आकर्षण राहतील. 4 लाख डॉलर्स एकूण बक्षीस रकमेची ही स्पर्धा कोरोना समस्येमुळे बंदिस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकाविना खेळविली जाणार आहे.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेपूर्वीच्या काही शेवटच्या पात्रता स्पर्धांपैकी ही एक स्पर्धा आहे. सदर स्पर्धेमध्ये 114 पुरूष आणि 114 महिला असे 33 देशांचे एकूण 228 बॅडमिंटनपटू सहभागी होणार आहेत. भारतातील कोरोनाची परिस्थिती बिकट होत असून दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये झपाटय़ाने वाढ होत असल्याने ही स्पर्धा जैवसुरक्षित कवचात प्रेक्षकाविना घेतली जाणार असल्याची माहिती स्पर्धां आयोजकांनी दिली आहे. या स्पर्धेवेळी प्रेक्षकांना आणि प्रसारमाध्यमाच्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही.
या स्पर्धेत भाग घेणाऱया दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मध्यपूर्व आणि युरोपियन देशातील त्याचप्रमाणे ब्रिटनमधील सर्व स्पर्धकांना तसेच प्रशिक्षक वर्गाला 7 दिवसांसाठी सक्तीचे क्वारंटाईन राहील. 3 मे रोजी विविध देशांचे बॅडमिंटनपटू दिल्लीत दाखल होणार आहेत. त्याचप्रमाणे इतर काही देशांचे खेळाडू आणि अधिकारी 6 मे रोजी दिल्लीत येणार असून त्यांच्यासाठी क्वारंटाईनचा कालावधी चार दिवसांचा राहील.
महिला एकेरीच्या विभागात विश्वविजेती कॅरोलिना मारीन मानांकनात आघाडीवर असून अन्य दहा अव्वल महिला बॅडमिंटनपटूंचा समावेश आहे. जपानची यामागुची, 2019 सालातील विश्वविजेती पी.व्ही. सिंधू, कोरियाची ऍन यंग, थायलंडची पी.चोचूवांग यांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये यजमान भारताचे 27 महिला आणि 21 पुरूष असे एकूण 48 बॅडमिंटनपटू सहभागी होत आहेत. मलेशियाचे 16 पुरूष आणि 10 महिला, चीनचे 6 पुरूष आणि 4 महिला बॅडमिंटनपटू या स्पर्धेत दाखल होत आहेत. पुरूष एकेरीच्या विभागात दोनवेळा विश्वविजेतेपद मिळविणारा मोमोटा, विद्यमान विजेता व्हिक्टर ऍक्सेलसेन, अँटोनसेन, झी ली, भारताचे के. श्रीकांत, बी. साईप्रणित, प्रणॉय, पी. कश्यप, चिराग शेट्टी, सिक्की रेड्डी, अश्विनी पोनाप्पा दुहेरीत भाग घेणार आहेत.