‘साँड की आँख’ने सुरुवात पांचिका लघुपटाचेही प्रदर्शन
प्रतिनिधी / पणजी
आंचिम हे व्यासपीठ भारतीय सिनेमाचे दर्शन घडविते आणि कौशल्य दाखविते. इंडियन पॅनोरमा विभागातील चित्रपटांची निवड उत्तमरित्या करण्यात आली आहे, असे महोत्सव संचालक चैतन्य प्रसाद यांनी इंडियन पॅनोरमाच्या उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी बोलताना सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांना व सांड की आँख चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार हिरनंदानी व पांचिका लघुपटाचे दिग्दर्शक अंकित कोठारी यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
इंडियन पॅनोरमा विभागाचे उद्घाटन तुषार हिरनंदानी दिग्दर्शित सांड की आँख या चित्रपटाने तर अंकित कोठारी दिग्दर्शित ‘पांचिका’ या लघुपटाने झाले. यावेळी दोन्ही चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माता उपस्थित होते.
तुषार हिरनंदानी दिग्दर्शित ‘सांड की आँख’ हा चित्रपट चंद्रो म्हणजे भूमी पेडणेकर आणि प्रकाशी म्हणजे तापसी पन्नू या दोन जावांच्या कथेवर आधारित आहे. ज्यांना खेडय़ातील पुरूषप्रधान समाज फारशी पचनी नाही पडत. परंतु त्या आपल्या मुलींसाठीच हातात बंदूक घेतात. वयाच्या साठाव्या वर्षी चंद्रो आणि प्रकाशीला स्वतःमधील नेमबाजीच्या प्रतिभेविषयी समजते आणि गावातील डॉक्टर यशपाल म्हणजेच विनीत कुमार यांच्या मदतीने त्या दोघी नेमबाजीचे प्रशिक्षण घ्यायला सुरूवात करतात. या दोघींची विजयीगाथा पाहणे म्हणजे ही मनोरंजनाची पर्वणी आहे. ही प्रेरणा एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे आणि मग गावात कशी पसरते हे पडद्यावर पाहणे रंजक आहे.
अंकित कोठारी दिग्दर्शित ‘पांचिका’ हा लघुपट एका सात वर्षीय मीरा या मुलीवर आधारित आहे. दुपारचे जेवण नेण्यासाठी मीठाचे वाळवंट पार करून निघते. वाटेत सुबा जी मुलगी तिच्यापासून अंतर ठेवते कारण अस्पृश्य असल्याने ती तिच्यासोबत खेळू शकत नाही. परंतु यांच्या मैत्रीची कहाणी आणि सामाजिक मर्यादेबद्दल गोटय़ांच्या आधारे कशाप्रकारे उलगडते याबद्दल ‘पांचिका’ हा लघुपट सांगतो.









