वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने आपल्या कर्मचाऱयांचे वेतन कमी करण्याची घोषणा केली आहे. कंपनीमधील सर्व कर्मचाऱयांचे वेतन 25 टक्क्यापर्यंत कमी करणार असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रोनोजॉय दत्ता यांनी सांगितले आहे. तर ते स्वतःही 25 टक्के कमी वेतन घेणार असून कोरेनाच्या प्रभावामुळे कंपनीच्या उत्पन्नात घट झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मागील एक महिन्यात कंपनीचे समभाग जवळपास 37 टक्क्यांनी घसरले आहेत. 19 फेब्रुवारीत कंपनीचे समभाग 1481 रुपये होते. ते आता 19 मार्च रोजी 924 रुपयावर आले आहेत. हे फक्त भारतामध्येच आहे, असे नाही तर जगभरातही अशी स्थिती असल्याची माहिती आहे.
गोएअर, स्पाइसजेट आणि विस्तारा या विमान कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणे कोरेनाच्या वाढत्या विषाणूमुळे रद्द केली आहेत. नियमित होणाऱया उड्डाणामध्ये कमी करण्यात आले असून कंपन्या आपल्या कर्मचाऱयांना विना वेतन रजेवर पाठवत आहेत.
हवाई वाहतूक नुकसानीत
आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक असोसिएशन (आयएटीए) यांच्या माहितीनुसार कोरेनाच्या वाढत्या धास्तीने विमान उद्योगाला 2020 मध्ये जवळपास 113 अब्ज डॉलरने उत्पन्नात घटीसह नुकसानीचे संकेत आहेत. या अगोदर 2008 मध्ये या प्रकारचे आर्थिक संकट निर्माण झाल्याची माहिती आहे.









