नागरी विमानोड्डाण क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवहार
►वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात मागील काही वर्षांपासून एअरलाइन्स कंपन्या व्यवसायातील हिस्सेदारीवरून तीव्र स्पर्धेला सामोऱ्या जात आहेत. अशा स्थिती इंडिगो एअरलाइन्सने स्पर्धेत आघाडी मिळविण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इंडिगो आणि एअरबस यांच्यात आता मोठा करार झाला आहे. इंडिगोने 500 एअरबस ए320 विमानांच्या खरेदीची घोषणा केली आहे. भारतीय एअरलाइन कंपनीकडून दिली जाणारी ही सर्वात मोठी ऑर्डर आहे.
इंडिगोने 500 एअरबस ए320 विमानांची ऑर्डर दिली आहे. या विमानांचा पुरवठा 2030 पासून 2035 दरम्यान होण्याची अपेक्षा असल्याचे इंडिगो एअरलाइनने सांगितले आहे. या व्यवहारासाठी इंडिगोच्या संचालक मंडळाकडून 50 अब्ज डॉलर्सच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. इंडिगो एअरलाइन्सकडून सध्या 300 हून अधिक विमानांचे संचालन होत आहे.
इंडिगोची ही ऑर्डर एअरबससोबत कुठल्याही एअरलाइनकडून करण्यात आलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार आहे. या 500 विमानांच्या इंजिनची निवड पुढील काळात केली जाणार आहे. यात ए320 आणि ए321 विमान सामील असणार आहे. व्यावसायिक एअरलाइनच्या इतिहासातील हा सर्वात मोठा व्यवहार असल्याचे एअरबसने म्हटले आहे.
यापूर्वी फेब्रुवारीमध्ये एअर इंडियाने 470 विमानांच्या खरेदीची घोषणा केली होती. यातील 250 विमाने एअरबस तर 220 विमाने बोइंग कंपनीकडून खरेदी करण्यात येणार आहे. एअर इंडिया आता टाटा समुहाच्या अंतर्गत कार्यरत आहे.आर्थिक संकटामुळे गो फर्स्ट एअरलाइनने स्वत:ला दिवाळखोर घोषित केल्याची पार्श्वभूमी असताना इंडिगोने विमान खरेदी कराराची घोषणा केली आहे.









