उचगांव / वार्ताहर
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्गनाईज्ड रिसर्च या नामवंत संशोधन संस्थेने अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा इंटरनॅशनल एज्युकेटर अॅवॉर्ड प्रा. डॉ. सौ. पूर्णिमा गिरीश नाईक यांना देऊन सन्मानित केले. प्रा. डॉ. नाईक यांनी संगणक अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाच्या संशोधन आणि विकास या कार्यात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे. संस्थेने प्रशस्तिपत्र, विशेष मेडल, संस्थेचे आजीवन सभासदत्व, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागासाठी प्रायोजकत्व देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण या अभियानांतर्गत संशोध आणि विकास कार्याला चालना देण्यासाठी संस्थेचे कार्य संपूर्ण जगभर चालते. संशोधन क्षेत्रासाठी उत्कृष्ठ योगदान देणाऱ्या नामवंतांचा सन्मान करुन त्यांचे मार्गदर्शन इतर संशोधकांना उपलब्ध करुन दिले जाते.
प्रा. डॉ. पूर्णिमा गिरीश नाईक या छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (सायबर) या संस्थेमध्ये कॉम्प्युटर स्टडीज डिपार्टमेंटमध्ये प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत. प्रा. डॉ. नाईक यांचे विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये 80 हून अधिक संशोधन प्रबंध प्रकाशित झाले आहेत. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानासाठी निगडीत 30 पुस्तके त्यांनी
लिहिली आहेत. स्कोपस इंडेक्स असलेल्या अनेक इंटरनॅशनल जर्नल्ससाठी त्यांना रिव्ह्यूयरचा सन्मान दिला गेला आहे. कॉम्प्युटर सायन्समधील वेब टेक्नॉलॉजीस, मोबाईल कॉम्प्युटिंग, सॉफ्ट कॉम्प्युटिंग आणि इंटरनेट सिक्युरिटी या अतिशय महत्वाच्या विषयांवर त्यांचे संशोधन प्रकल्प सुरु आहेत. या संशोधनामुळेच त्यांना यापूर्वी भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय संशोधन बेस्ट रिव्ह्यूयर म्हणून गौरविले आहे.
प्रा. डॉ. पूर्णिमा गिरीश नाईक यांना सायबरचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. रणजीत शिंदे, ट्रस्टी ऋषिकेश शिंदे, डॉ. व्ही. एम. हिलगे, संचालक डॉ. सी. एस. दळवी, विभागप्रमुख डॉ. आर. व्ही. कुलकर्णी यांचे प्रोत्साहन लाभले.









