लंडन / वृत्तसंस्था
इंग्लंडचा सलामीवीर जेसॉन रॉयला 2500 पौंड दंड व 2 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातून निलंबन, अशी दुहेरी शिक्षा ठोठावण्यात आली. ईसीबीने या कारवाईची घोषणा केली. मात्र, ही शिक्षा का करण्यात आली, याचे कारण देण्यात आले नाही. ‘क्रिकेट आयोगाच्या शिस्तपालन समितीने जेसॉन रॉयवर ठपका ठेवला होता आणि तो जेसॉनने मान्य केला. त्यानुसार, त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली’, इतकेच ईसीबीने नमूद केले.
31 वर्षीय जेसॉन रॉय मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील स्पेशालिस्ट असून त्याने 98 वनडे सामन्यात 40.19 ची सरासरी नोंदवली आहे. यापूर्वी जानेवारीत विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत त्याने इंग्लंडचे शेवटचे प्रतिनिधीत्व केले. आता जूनमध्ये नेदरलँड्सविरुद्ध होणाऱया वनडे मालिकेसाठी निवडीची त्याला अपेक्षा असणार आहे.









