ऍस्टन व्हिला-शेफील्ड युनायटेड सामन्याने होणार सुरुवात
लंडन
बुधवारी 17 जूनपासून ऍस्टन व्हिला व शेफील्ड युनायटेड यांच्यातील सामन्याने इंग्लिश प्रिमियर लीगची पुन्हा सुरुवात होणार आहे. कोरोना महामारीमुळे तीन महिन्यांच्या ब्रेकनंतर प्रेक्षकांविना यातील सामने खेळविले जाणार आहेत. विविध सामने होणार असले तरी लिव्हरपूल 30 वर्षांत पहिल्यांदाच विजेतेपद मिळविणार हे मात्र निश्चित झालेले आहे.
याशिवाय अन्य काही गोष्टी या स्पर्धेच्या उर्वरित भागात निश्चित होणार असून त्यात पदावनती, पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरणारे संघ यांचा समावेश आहे. कोरोनामुळे मार्चमध्ये स्पर्धा थांबविण्यात आली तेव्हा लिव्हरपूल मँचेस्टर सिटीपेक्षा तब्बल 25 गुणांनी आघाडीवर होते आणि जेतेपदाच्या ते अगदी उंबरठय़ावरच पोहोचले होते. 1990 नंतर प्रथमच त्यांना जेतेपदावर कब्जा मिळविता येणार आहे. कोरोनामुळे त्यांची जेतेपदाची पार्टी लांबली असली तरी ती होईल, याबाबत साशंकताच व्यक्त केली जात आहे. आणखी दोन विजय मिळविल्यास आकडेवारीमध्ये त्यांना सिटी संघ गाठू शकणार नाही, अशी स्थिती आहे.
यातील सामन्यांचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, एसडी, एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1 एचडी, एसडी या वाहिन्यावरून केले जाणार आहे. भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री 10.30 वाजता ऍस्टन व्हिला व शेफील्ड युनायटेड, मध्यरात्री 12.45 वाजता मँचेस्टर सिटी व अर्सेनल, शुक्रवारी रात्री 10.30 वाजता नॉर्विच सिटी व साऊदम्प्टन, मध्यरात्री 12.45 वाजता टॉटनहॅम व मँचेस्टर युनायटेड असे सामने होणार आहेत. रविवारी रात्री 11.30 वाजता एव्हर्टन व लिव्हरपूल यांचा सामना गुडिसन पार्क येथे होणार आहे.









