वृत्तसंस्था/ लंडन
यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या अॅशेस कसोटी मालिकेतील येथे सोमवारपासून सुरु होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली असून 40 वर्षीय जेम्स अँडरसनचे पुनरागमन झाले आहे.
या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने जिंकून इंग्लंडवर 2-0 अशी आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडने तिसरी कसोटी जिंकून मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर बुधवारपासून खेळविल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी करीता इंग्लंडच्या निवड समितीने अँडरसनला अंतिम अकरा खेळाडूत निवडण्यात आले आहे. या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत अँडरसनला वगळण्यात आले होते. इंग्लंडने ही तिसरी कसोटी 3 गड्यांनी जिंकली होती. ओल्ड ट्रॅफोर्डच्या मैदानावर अँडरसनची आतापर्यंतची कामगिरी लक्षात घेत निवड समितीने त्याला पुन्हा संघात स्थान दिले आहे. 2004 पासून अँडरसनने ओल्ड ट्रॅफोर्डच्या मैदानावर 10 कसोटीत 37 गडी बाद केले आहेत.
इंग्लंड संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), डकेट, क्रॉले, मोईन अली, रुट, ब्रूक, बेअरस्टो, वोक्स, मार्कवूड, ब्रॉड आणि अँडरसन.









