वृत्तसंस्था/ पोर्ट एलिझाबेथ
येथे सुरू असलेल्या आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप अंतर्गत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱया सामन्यात इंग्लंडचा संघ यजमान दक्षिण आफ्रिकेवर मोठय़ा फरकाने विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या सामन्यात इंग्लंडकडून दक्षिण आफ्रिकेला फॉलो ऑन स्वीकारावा लागला.
या सामन्यात इंग्लंडने आपला पहिला डाव 9 बाद 499 धावांवर घोषित केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 209 धावांत आटोपला. दक्षिण अफ्रिकेने 6 बाद 208 या धावसंख्येवरून तिसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे चार गडी केवळ एका धावेची भर घालत तंबूत परतले. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात डिकॉकने 9 चौकारांसह 63, एल्गारने 6 चौकारांसह 35, फिलँडरने 5 चौकारांसह 27, डय़ुसेनने 3 चौकारांसह 24, मलानने 2 चौकारांसह 18, नॉर्टने 2 चौकारांसह 18 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे बेसने 51 धावांत 5 तर ब्रॉडने 30 धावांत 3 तसेच करन आणि स्टोक्स यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या डावात 290 धावांची भक्कम आघाडी घेतल्याने त्यांनी दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन दिला. शेवटची बातमी हाती आली त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱया डावात 2 बाद 22 धावा जमविल्या होत्या. एल्गार 15 तर हमझा 2 धावांवर बाद झाले. दक्षिण आफ्रिकेचा संघ अद्याप 268 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे आठ गडी खेळावयाचे आहेत. या कसोटीतील खेळाचा एक दिवस बाकी असून इंग्लंडला मालिका विजयाची संधी मिळाली आहे.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प. डाव 9 बाद 499 (पोप नाबाद 135, स्टोक्स 120, क्रॉले 44, करन 44, वूड 42, सिबली 36, केशव महाराज 5-180, रबाडा 2-97, पॅटरसन आणि नॉर्ट प्रत्येकी एक बळी),
दक्षिण आफ्रिका प.डाव 86.4 षटकांत सर्वबाद 209 (डिकॉक 63, एल्गार 35, फिलँडर 27, बेस 5-51, ब्रॉड 3-30, करन 1-32, स्टोक्स 1-26), दक्षिण आफ्रिका दु. डाव- 12 षटकांत 2 बाद 22 (मलान खेळत आहे 3 एल्गार 15, हामझा 2, वूड 2-3).









