वृत्तसंस्था/ कराची
इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ येत्या ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदाच पाकच्या ऐतिहासिक दौऱयावर येणार असल्याची घोषणा पीसीबीने गुरूवारी येथे केली आहे. उभय संघामध्ये दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. याच कालावधीत इंग्लंडचा पुरूष संघही पाक दौऱयावर येणार आहे.
इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाचा हा पहिला ऐतिहासिक पाक दौरा म्हणून ओळखला जाईल. इंग्लंडचा पुरूष संघ 2005 नंतर पहिल्यांदाच पाकच्या दौऱयावर येत आहे. इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाचे हे दोन टी-20 सामने 14 आणि 15 ऑक्टोबरला आयोजित केले आहेत. याच कालावधीत पाक आणि इंग्लंड पुरूष संघातील टी-20 चे दोन सामने खेळविले जाणार आहेत. इंग्लंड आणि पाक पुरूष संघातील तीन सामन्यांची वनडे मालिका 18, 20, 22 ऑक्टोबर रोजी आयोजित केली आहे. वनडे मालिकेतील सर्व सामने कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर होणार आहेत, अशी माहिती पीसीबीचे प्रमुख कार्यकारी वासीम खान यांनी दिली.
विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघाविरूद्ध तीन सामन्यांची ही वनडे मालिका पाक संघाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच मालिका खेळण्यासाठी पाकमध्ये येत असून आयसीसीच्या 2022 साली होणाऱया महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी पूर्वतयारी म्हणून पाक महिला क्रिकेट संघाला ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.









