बेन स्टोक्सच्या नेतृत्वाची इनिंग सुरु
लंडन / वृत्तसंस्था
न्यूझीलंडविरुद्ध आजपासून (गुरुवार दि. 2) लॉर्ड्स मैदानावर खेळवल्या जाणाऱया पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने डरहॅम सीमर मॅथ्यू पॉट्सला पदार्पणाची संधी दिली आहे. पेग ओव्हर्टनऐवजी मॅथ्यूला संधी देण्याचा निर्णय ईसीबीने घेतला. बेन स्टोक्सने नेतृत्वाची धुरा स्वीकारल्यानंतर त्याच्यासाठी ही पहिली मालिका असेल. आज पहिल्या दिवसाच्या खेळाला भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 3.30 वाजता प्रारंभ होणार आहे.
23 वर्षीय पॉट्सने वर्षभराच्या कालावधीत कौंटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण योगदान दिले. त्याने डरहॅम संघातर्फे 18.57 च्या सरासरीने 35 बळी घेतले. इंग्लंडने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी 13 सदस्यीय संघ जाहीर केला असून यॉर्कशायरचा हॅरी ब्रूकला पर्यायी फलंदाज म्हणून समाविष्ट केले आहे.
सलामीला ऍलेक्स लीस-झॅक क्राऊली, तिसऱया स्थानी ऑलि पोप, मधल्या फळीत जो रुट, बेअरस्टो, स्टोक्स अशी लाईनअप असेल. बेन फोक्स यष्टीरक्षण करेल आणि सातव्या स्थानी फलंदाजीला उतरेल. जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांच्यावर नव्या चेंडूची जबाबदारी असणार आहे. जॅक लीचला प्रंटलाईन स्पिनर म्हणून निवडले गेले आहे.
संघ
इंग्लंड (अंतिम संघ) ः झॅक क्राऊली, ऍलेक्स लीज, ऑलि पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), मॅथ्यू पॉट्स, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.
न्यूझीलंड (संभाव्य) ः टॉम लॅथम, विल यंग, केन विल्यम्सन (कर्णधार), डेव्हॉन कॉनव्हे, डॅरेल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), कॉलिन डे ग्रँडहोम, काईल जेमिसन, टीम साऊदी, नील वॅग्नर, मॅट हेन्री/अजाझ पटेल.
सामन्याची भारतीय प्रमाणवेळ ः दुपारी 3.30 वा.









