मध्यफळी, तळाच्या फलंदाजांचा प्रतिकार, क्रॉले-स्टोक्स यांची अर्धशतके, कमिन्सचे 3 बळी
वृत्तसंस्था/ सिडनी
कमी होत चाललेल्या प्रकाशात इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी शेवटच्या दिवशी कडवा प्रतिकार करीत येथे झालेली ऍशेस मालिकेतील चौथी कसोटी अनिर्णीत राखण्यात यश मिळविले. क्रॉले व स्टोक्स यांनी अर्धशतके नोंदवली तर स्कॉट बोलँडने 3 बळी मिळविले. दोन्ही डावात शतके नोंदवणाऱया उस्मान ख्वाजाला सामनावीराचा बहुमान मिळाला.
शेवटच्या सत्रात पॅट कमिन्स व स्कॉट बोलँड यांनी झटपट तीन बळी मिळवित ऑस्ट्रेलियासाठी विजयाची संधी निर्माण केली होती. पण जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड व नंतर जिमी अँडरसन यांनी अत्यंत दडपणाखाली शेवटची दहा षटके खेळून काढत ऑस्ट्रेलियाची विजयाची संधी हिरावून घेतली. दोन षटके बाकी असताना स्मिथने लीचला बाद केले. पण ब्रॉड व अँडरसन यांनी उर्वरित दोन षटके खेळून काढत सामना अनिर्णीत राखताना 388 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने 102 षटकांत 9 बाद 270 धावा जमविल्या. ब्रॉड 8 व अँडरसन शून्यावर नाबाद राहिले. इंग्लंडसाठी या मालिकेतील हा सर्वात चांगला निकाल होता, असे म्हणावे लागेल. पहिले तीन सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने याआधीच मालिका जिंकली आहे.
इंग्लंडने या मालिकेत फलंदाजीत प्रथमच चांगले प्रदर्शन केले. त्यामुळे ते हा सामना सहजपणे अनिर्णीत राखणार असेच वाटत होते. पण शेवटचा तास बाकी असताना कमिन्सने जोस बटलर व मार्क वूड यांना तीन चेंडूंच्या फरकाने बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला संधी असल्याचे वाटू लागले. बोलँडने नंतर पहिल्या डावातील शतकवीर बेअरस्टोला लाबुशानेकरवी झेलबाद केले. दोन कसोटीतील बोलँडचा हा 14 वा बळी होता. त्याने 41 धावा केल्या आणि यावेळी इंग्लंडची स्थिती 8 बाद 237 अशी झाली. यानंतर मात्र लीच, ब्रॉड व अँडरसन यांनी उर्वरित 10 षटके खेळून काढत ऑस्ट्रेलियाला चौथ्या विजयापासून रोखले. प्रकाश ओसरत चालल्याने शेवटची तीन षटके स्पिनर्सना टाकावी लागली.
त्याआधीच्या सत्रात पूर्ण तंदुरुस्त नसतानाही अष्टपैलू बेन स्टोक्स नेहमीप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या मार्गातील अडथळा बनला. दुखापतीच्या वेदना होत असल्या तरी त्याने आक्रमक फटके मारणे सोडले नव्हते. पहिल्या डावात त्याने 66 धावा जमविल्या होत्या. यावेळी त्याने 10 चौकार, 1 षटकार मारत 60 धावा जमविल्या. लियॉनला त्याने द्विधा मनस्थितीत फटका मारला आणि स्लिपमध्ये तो झेलबाद झाला. लियॉनने त्याला बाद करण्याची ही नववी वेळ होती. पहिल्या डावातही लियॉननेच त्याला बाद केले होते. शेवटच्या सत्रातील सुरुवातील कमिन्सने प्रथम बटलरला (11) पायचीत केले. पंचांनी त्याला नाबाद दिले होते. पण डीआरएसमध्ये तो बाद असल्याचे स्पष्ट झाले. दोन चेंडूनंतर त्याने वूडचाही बळी मिळविला. बोलँडने नंतर बेअरस्टोला बाद केल्यानंतर इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांवर सामना वाचविण्याची वेळ आली. क्लोज इन कॅचिंगसाठी 9 क्षेत्ररक्षक सभोवती असले तरी लीच, ब्रॉड व अँडरसन यांनी धीराने फलंदाजी करीत पराभव टाळला.
चहापानाआधी रूट व स्टोक्स यांनी 26 षटकांत 60 धावांची भागीदारी केली होती. बोलँडने रूटला 24 धावांवर बाद केले. सकाळच्या सत्रात हमीद (9) व मलान (4) लवकर बाद झाले. हमीदला जीवदानही मिळाले होते. पण त्याला त्याचा लाभ घेता आला नाही. पण झॅक क्रॉलीने आक्रमक धोरण स्वीकारत 69 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. लियॉनला गोलंदाजी मिळाल्यावर त्याने तिसऱयाच षटकात मलानचा त्रिफळा उडविला. यावेळी इंग्लंडची स्थिती 2 बाद 74 अशी झाली होती. क्रॉले नंतर 77 धावांवर बाद झाला, त्यात 13 चौकारांचा समावेश होता.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया पहिला डाव 8 बाद 416 डाव घोषित, इंग्लंड पहिला डाव 294, ऑस्ट्रेलिया दुसरा डाव 6 बाद 265 डाव घोषित, इंग्लंड दुसरा डाव 102 षटकांत 9 बाद 270 (क्रॉले 77, स्टोक्स 60, बेअरस्टो 41, लीच 26, रूट 24, बटलर 11, बोलँड 3-30, लियॉन 2-28, कमिन्स 2-80, स्मिथ 1-10, ग्रीन 1-38.)
बॉक्स
जखमी बटलर शेवटच्या कसोटीतून बाहेर
इंग्लंडचा जोस बटलर जखमी झाल्याने पाचव्या व शेवटच्या कसोटीत तो खेळू शकणार नसल्याचे सांगण्यात आले. त्याच्या बोटाला दुखापत झाल्याचे कर्णधार रूटने सांगितले. रविवारी इंग्लंडची मध्यफळी व तळाच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या माऱयाचा कवडा प्रतिकार करीत सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळविले. बेन स्टोक्सलाही साईडस्ट्रेन असल्याने तसेच बेअरस्टोचाही अंगठा दुखावला असल्याने तेही शेवटच्या कसोटीत खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. बटलर आता मायदेशी परतणार असल्याचेही रूटने सांगितले.









