आघाडी फळी मजबूत असल्याने यजमानांची बाजू वरचढ ठरणार असल्याचे मत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताकडे दर्जेदार वेगवान मारा, फलंदाजीतील खोली आणि आघाडी फळीच्या कामगिरीतील सातत्य तसेच इंग्लंडच्या आघाडीच्या तीन फलंदाजांच्या कामगिरीतील सातत्याचा अभाव यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत यजमान संघच फेव्हरिट असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी व्यक्त केले आहे.
कर्णधार विराट कोहलीच्या पुनरागमनामुळे संघाची फलंदाजी लाईनअप आणखी बळकट होणार असल्याचे त्यांना वाटते. ‘नुकत्याच झालेल्या रोमहर्षक मालिकेत विराटच्या गैरहजेरीसह अनेक अडथळय़ांवर मात करून भारताने ऑस्ट्रेलियावर मालिकाविजय मिळविण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे त्यांचे मनोबल खूपच उंचावलेले आहे. त्यात आता विराटचे पुनरागमन झाल्याने भारतीय फलंदाजी आता ‘बुलेटप्रूफ’सारखी बनली आहे,’ असे चॅपेल यांनी स्तंभलेखनात म्हटले आहे. ‘याशिवाय आर.अश्विन, हार्दिक पंडय़ा, इशांत शर्मा हे खेळाडूदेखील उपलब्ध झाल्याने भारतीय संघ ‘अजिंक्य’ असल्यासारखा वाटतो,’ असेही त्यांना वाटते.
भारत-इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून चेन्नईत सुरुवात होणार आहे. इंग्लंडने अलीकडेच लंकेवर 2-0 असा एकतर्फी मालिकाविजय मिळविला असला तरी भारताकडे आघाडीचे भक्कम फलंदाज असल्याने पारडे त्यांच्या बाजूने जास्त झुकते, असेही चॅपेल यांना वाटते. ‘हार्दिक पंडय़ासारखाच अष्टपैलू असणारा बेन स्टोक्स या मालिकेसाठी उपलब्ध झाल्याने इंग्लंडसाठी ही निश्चितच जमेची बाजू असेल. त्याची अष्टपैलू क्षमता संघासाठी उपयुक्त ठरणारी असेल. इंग्लंडचा वेगवान मारा भक्कम आहेच, पण त्यात जोफ्रा आर्चरची भर पडल्याने त्याची मजबुती आणखी वाढली आहे. मात्र इंग्लंडच्या आघाडी फळीतील फलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला आहे. त्यांची ही बाजू भारताच्या तुलनेत कमकुवत असल्याने येथे भारत सरस ठरू शकतो. प्रभावी प्रदर्शन करणारा शुभमन गिल, प्रतिभावान पण काहीसे दोष असलेला रोहित शर्मा आणि भक्कम बचाव असणारा चेतेश्वर पुजारा हे भारताचे तीन आघाडीचे फलंदाज इंग्लंडच्या आघाडीफळीपेक्षा बरेच सरस आहेत. यामुळेच या मालिकेत भारताची बाजू वरचढ असल्याचे मला वाटते,’ असेही चॅपेल यांनी म्हटले आहे.
आघाडीचे खेळाडू रॉरी बर्न्स व डॉम सिबली अपयशी ठरल्यास कर्णधार जो रूटवरील दडपणात आणखी भर पडणार आहे, असेही चॅपेल यांना वाटते. ‘सिबलीकडे अव्वल स्तरावर यश मिळविण्यासाठी लागणारी जिगर व निर्धार आहे. पण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोलंदाजांना खेळण्याचे त्याचे तंत्र शंकास्पद वाटते. बर्न्सदेखील सिबलीसारखाच आहे. त्यामुळे जर हे दोघे आव्हान पेलण्यात अपयशी ठरले तर इंग्लंड संघ अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे लंकेतील फॉर्म कायम राखल्यास कर्णधार रूटला तारणहारची भूमिका पुन्हा एकदा करावी लागणार आहे. ‘सलामीवीर झॅक क्रॉली हा शुभमन गिलप्रमाणेच गुणवान आहे. मात्र लंकेतील त्याच्या अपयशामुळे इंग्लंडच्या गोटात चिंता निर्माण झाली असून त्याला विश्रांती देण्याची हीच योग्य वेळ आहे, याचा त्यांनी विचार करायला हवा,’ असे चॅपेल म्हणाले.
त्यांनी दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजीच्या बलाबद्दलही आपली मते मांडली. या विभागात दोन्ही संघ सारख्याच ताकदीचे आहेत, असे त्यांना वाटते. ‘आर्चरची उपस्थिती, जिमी अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांचा अनुभव व कौशल्य यामुळे इंग्लंडची वेगवान गोलंदाजीची बाजू थोडीशी वरचढ ठरते. मात्र भारतानेही याबाबतील आता खूपच प्रगती केली असून ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत सलग दोन मालिकांत नमवताना त्यांनी आपली क्षमता सिद्ध करून दाखविली आहे. भारताकडे फक्त दर्जेदार वेगवान मारा आहे, असे नव्हे तर त्यांची संख्याही जादा असल्याने त्यात खोलीही असल्याचे त्यांनी ऑस्ट्रेलियात दाखवून दिले आहे,’ असे त्यांचे म्हणणे आहे. दोन्ही संघांच्या मधल्या फळीबद्दलही त्यांनी मत मांडले असून दोन्ही संघांची मध्यफळी भक्कम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारताकडे अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, हार्दिक पंडय़ा तर इंग्लंडकडे स्टोक्स, बटलर चांगल्या सुरुवातीचा लाभ उठवू शकणारे फलंदाज आहेत. ओली पोपच्या समावेशामुळे इंग्लंडची ही फळी आणखी मजबूत झाली आहे. मात्र बटलर एका कसोटीनंतर परतणार असल्याने तसेच रवींद्र जडेजा भारतीय संघात परतणार असल्याने, ही एक बाब भारताला जास्त लाभदायक ठरणारी आहे, असेही चॅपेल यांना वाटते.









