वृत्तसंस्था/ ओव्हल
पाच सामन्यांच्या अॅशेस कसोटी मालिकेत येथे सुरू असलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात 4 बाद 265 धावा जमवत ऑस्ट्रेलियावर 253 धावांची आघाडी मिळवली आहे. इंग्लंडतर्फे क्रॉले आणि रुट यांनी शानदार अर्धशतके झळकवली.

या मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 2-1 अशी आघाडी घेत अॅशेस स्वत:कडे यापूर्वीच राखली आहे. इंग्लंडला ही चालू मालिका बरोबरीत राखण्याची संधी निश्चित आहे. या शेवटच्या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 283 धावा जमवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 103.1 षटकात 295 धावा जमवत नाममात्रा 12 धावांची आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव शुक्रवारी खेळाच्या शेवटच्या सत्रातच आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या डावात ख्वाजाने 7 चौकारांसह 47, स्टिव्ह स्मिथने 6 चौकारांसह 71, वॉर्नरने 3 चौकारांसह 24, मार्शने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 16, कॅरेने 1 चौकार आणि 1 षटकारासह 10, कर्णधार कमिन्सने 4 चौकारांसह 36 आणि मर्फीने 3 षटकार आणि 2 चौकारांसह 34 धावा जमवल्या. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात शेवटच्या दोन गड्यांनी समयोचित फलंदाजी केल्याने ऑस्ट्रेलियाला 295 धावापर्यंत मजल मारता आली. कमिन्स आणि मर्फी यांनी नवव्या गड्यासाठी 49 धावांची भागीदारी केली. इंग्लंडतर्फे वोक्सने 3 तर ब्रॉड, वूड आणि रुट यांनी प्रत्येकी 2, अँडरसनने एक गडी बाद केला.
शनिवारी इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावाला दमदार सुरुवात केली. क्रॉले आणि डकेट या सलामीच्या जोडीने 17 षटकात 79 धावांची भागीदारी केली. या जोडीने अर्धशतकी भागीदारी 53 चेंडूत नोंदवली. स्टार्कने इंग्लंडी ही जोडी फोडताना डकेटला कॅरेकरवी झेलबाद केले. त्याने 55 चेंडुत 7 चौकारांसह 42 धावा जमवल्या. इंग्लंडचे शतक 123 चेंडूत फलकावर लागले. उपाहारावेळी इंग्लंडने 25 षटकात 1 बाद 130 धावा जमवल्या होत्या. क्रॉले 71 तर स्टोक्स 12 धावर खेळत होते. क्रॉलेने आपले अर्धशतक 5 चौकारांच्या मदतीने 61 चेंडूत झळकवले. तर स्टोक्ससमवेत दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी 41 चेंडूत नोंदवली.
उपाहारानंतर क्रॉले कमिन्सच्या गोलंदाजीवर स्मिथकरवी झेलबाद झाला. त्याने 76 चेंडूत 9 चौकारांसह 73 धावा जमवताना स्टोक्ससमवेत दुसऱ्या गड्यासाठी 61 धावांची भागीदारी केली. क्रॉले बाद झाल्यानंतर स्टोक आणि रुट या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 73 धावांची भर घातली. कर्णधार बेन स्टोक्स मर्फीच्या गोलंदाजीवर कमिन्सकरवी झेलबाद झाला. त्याने 67 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 42 धावा जमवल्या. स्टोक्स बाद झाल्यानंतर इंग्लंडने आपला चौथा गडी लवकर गमवला. हॅझलवूडने ब्रुकला 7 धावांवर झेलबाद केले. रुटने आपले अर्धशतक 1 षटकार आणि 8 चौकाराच्या मदतीने झळकवले. इंग्लंडचे द्विशतक 233 चेंडूत फलकावर लागले तर इंग्लंडच्या 250 धावा 283 चेंडूत नोंदवल्या गेल्या. चहापानावेळी इंग्लंडने 49 षटकात 4 बाद 265 धावा जमवल्या होत्या. रुट 1 षटकार आणि 8 चौकारांसह 61 तर बेअरस्टो 5 चौकारांसह 34 धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्क, हॅझलवूड, कमिन्स आणि मर्फी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड प. डाव 54.4 षटकात सर्व बाद 283, ऑस्ट्रेलिया प. डाव 103.1 षटकात सर्वबाद 295 (उस्मान ख्वॉजा 7 चौकारांसह 47, वॉर्नर 3 चौकारांसह 24, लाबूशेन 9, हेड 4, मार्श 1 षटकार आणि 1 चौकारासह 16, कॅरे 1 षटकार आणि 1 चौकारासह 10, स्मिथ 6 चौकारांसह 71, स्टार्क 7, कमिन्स 4 चौकारासह 36, मर्फी 3 षटकार आणि 2 चौकारासह 34, हॅझलवूड नाबाद 6, अवांतर 31, ब्रॉड 2-49, वूड 2-62, अँडरसन 1-67, वोक्स 3-61, रुट 2-20), इंग्लंड दु. डाव 49 षटकात 4 बाद 265 (क्रॉले 9 चौकारांसह 73, डकेट 7 चौकारांसह 42, स्टोक्स 1 षटकार आणि 3 चौकारांसह 42, रुट 1 षटकार आणि 8 चौकारांसह 61 धावावर खेळत आहे, ब्रुक 1 षटकारासह 7, बेअरस्टो 5 चौकारांसह 34 धावांवर खेळत आहे, अवांतर 6, स्टार्क, हॅझलवूड, कमिन्स, मर्फी प्रत्येकी एक बळी).
धावफलक चहापानापर्यंत.









