वृत्तसंस्था/ लंडन
2021 च्या क्रिकेट हंगामातील इंग्लंडमध्ये पुरुषांच्या कौंटी क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धेचे प्राथमिक गट वेळापत्रकाची घोषणा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळातर्फे शुक्रवारी करण्यात आली. 8 एप्रिल 2021 पासून इंग्लीश कौंटी क्रिकेट हंगामाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील विद्यमान विजेता इसेक्स संघाचा सलामीचा सामना 8 एप्रिलला वुर्सेस्टरशायर संघाबरोबर होणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणारा सॉमरसेटचा संघ आपले पुनरागमन लॉर्ड्स मैदानावर करणार आहे. सॉमरसेट आणि इसेक्स यांच्यात चालू उन्हाळी मोसमातील बॉब विलीस करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना खेळला गेला होता. सॉमरसेटचा 2021 च्या इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेतील प्राथमिक गट फेरीतील पहिला सामना मिडलसेक्स संघाबरोबर होणार आहे. इंग्लंडमधील उर्वरित पुरुष आणि महिलांच्या पांढरा चेंडू वापरात येत असलेल्या स्पर्धांचे वेळापत्रक 2021 सालाच्या प्रारंभी जाहीर केले जाईल, असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले. आगामी उन्हाळी मोसमात पुरुषांच्या इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेचा आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये प्रथमश्रेणी क्रिकेटमधील 18 संघांनी आपण सहभागी होणार असल्याची हमी गेल्या ऑक्टोबर महिन्यात दिली होती.
2021 च्या इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेच्या नव्या आराखडय़ानुसार 18 संघांची विभागणी तीन गटांमध्ये करण्यात येणार आहे. तसेच या संघांचे पाच सामने त्यांच्या घरच्या मैदानावर तर पाच सामने बाहेरच्या मैदानावर खेळविले जातील. प्राथमिक गटातील वेळापत्रकानुसार पहिल्या नऊ फेऱयातील सामने सलग आठवडय़ामध्ये घेतले जातील. प्रत्येक आठवडय़ाच्या गुरुवारपासून ते रविवारपर्यंत हे सामने खेळविण्यात येतील. या स्पर्धेच्या प्राथमिक साखळी गटाचा शेवट जुलै महिन्यात केला जाईल. त्याचप्रमाणे दहाव्या आणि अकराव्या फेरीतील सामने रविवारी घेतले जातील. प्राथमिक साखळी फेरी संपल्यानंतर प्रत्येक गटातील पहिले दोन संघ डिव्हिजन-1 मध्ये दाखल होतील. डिव्हिजन-1 मधील विजेता संघ 2021 च्या कौंटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील विजेता म्हणून घोषित केला जाईल.









