प्रतिनिधी / कोल्हापूर
इंग्लंडच्या राणीच्या वैयक्तिक संग्रहालयातील रॉयल कलेक्शन ट्रस्टमधील तलवार छत्रपती शिवाजी महाराज यांचीच असल्याचे एका कॅटलॉगमधून समोर आले आहे.ही तलवार भारतात आणण्यासाठी शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 13 मार्च रोजी तावडे हॉटेल जवळ आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे अध्यक्ष हर्षल सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सुर्वे म्हणाले,कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांनी 1875 मध्ये भारत भेटीवर आलेल्या तत्कालीन ग्रेट ब्रिटनचा युवराज प्रिन्स ऑफ वेल्स याला एक तलवार व कट्या भेट दिली होती. ती तलवार शककर्ते शिवाजी महाराज यांच्या वापरातील जगदंबा नावाची तलवार होती. हे यापूर्वी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी त्यांच्या शोध भवानी तलवारीचा या ग्रंथात सिध्द केले आहे. ती तलवार सद्या इंग्लंडच्या राणीच्या वैयक्तिक संग्रहालयात रॉयल कलेक्शनमध्ये आहे. संग्रहालयाचे अभिरक्षक तलवार पाहण्यासाठी गेलेल्या भारतातील लोकांना ही तलवार शिवाजी महाराजांची नसल्याचे दाखले देतात.पण ती तलवार छत्रपती शिवाजी महाराजांचीच असल्याचे एका कॅटलॉगमधून समोर आहे. सन 1875-76 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीनंतर तयार झालेला त्याचा कॅटलॉग समोर आला आहे. हा कॅटलॉग इंग्लंडमधील साऊथ केन्स्टींग गॉन म्युझियम चे संचालक सी पर्डन क्लर्क यांनी तयार केला आहे. तो कलेक्शन ऑफ इंडियन आर्म्स ऍन्ड ऑब्जेक्ट ऑफ आर्ट या नावाने छापला आहे. यामध्ये 1875-76 च्या प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीवेळी संपूर्ण भारतातून भेट म्हणून दिलेली शस्त्रे आणि मौल्यवान वस्तूंची माहिती दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची ही तलवार भारतात आणण्यासाठी शिवदुर्ग संवर्धन च्या वतीने चळवळ सुरु आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्रे तसेच मेल पाठवले आहेत.याकडे लक्ष वेधण्यासाठी 13 मार्च रोजी तावडे हॉटेलजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. 23 मार्च पासून पुण्यात भारत व इंग्लंड यांच्यामध्ये 20-20 क्रिकेट सामना होत आहे. तलवारीच्या प्रश्नाकडे इंग्लंडचे लक्ष वेधण्यासाठी त्याठिकाणी गनिमी काव्याने जाणार असल्याचे सुर्वे यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला प्रदीप हांडे,चैतन्य अष्टेकर,रविराज कदम,अमृता सावेकर,आदित्य पवार,युवराज हळदीकर,देवराज सावंत,प्रमोद नाईक उपस्थित होते.
Previous Articleसांगली : अभिनेते अमीर खान करमाळे येथे देणार भेट
Next Article शुटिंग चॅम्पियनशिपमध्ये यशवंत शिंदे यांना सुवर्णपदक









