वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
येथे सुरू असलेल्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने यजमान दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 466 धावांचे कठीण आव्हान दिले असून शेवटची बातमी हाती आली त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने दुसऱया डावात 4 बाद 192 धावा जमविल्या होत्या.
या शेवटच्या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 400 धावा जमविल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 183 धावांत आटोपला. इंग्लंडने 217 धावांची भक्कम आघाडी मिळविली. त्यानंतर इंग्लंडने दुसऱया डावात 248 धावा जमवित दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 466 धावांचे आव्हान दिले. दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱया डावाला सुरूवात केली आणि त्यांनी 4 बाद 192 धावापर्यंत मजल मारली होती.
दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱया डावात सलामीचा फलंदाज मॅलेनने 3 चौकारांसह 22, एल्गारने 4 चौकारांसह 24 धावा जमविल्या. व्हॅन डेर डय़ुसेनने चिवट फलंदाजी करत 138 चेंडूत 2 षटकार आणि 15 चौकारांसह 98 धावा जमविल्या. त्याचे शतक दोन धावांनी हुकले. डय़ुसेन आणि डु प्लेसिस यांनी तिसऱया गडय़ासाठी 92 धावांची भागिदारी केली. डु प्लेसिसने 5 चौकारांसह 35 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे स्टोक्सने 2 तर वोक्स आणि वूड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. इंग्लंडने या मालिकेत 2-1 अशी आघाडी यापूर्वीच घेतली आहे.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प. डाव- सर्वबाद 400, दक्षिण आफ्रिका प. डाव- सर्वबाद 183, इंग्लंड दु. डाव- सर्वबाद 248, दक्षिण आफ्रिका दु. डाव- 62.3 षटकांत 4 बाद 192 (डय़ुसेन 98, मलान 22, एल्गार 24, डु प्लेसिस 35. स्टोक्स 2-28, वूड 1-34, वोक्स 1-30),









