रयत क्रांती पक्षाची स्थापना
सांगली / प्रतिनिधी
लोकशाहीत रयत दुबळी आणि राज्यकर्ते, प्रशासक गब्बर झाले. आता रयतेचा आवाज असलेले कार्यकर्ते राज्यकर्ते बनले पाहिजेत अशी साद घालत शेतकरी नेते भाजप आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांनी रायरेश्वर येथे रविवारी रयत क्रांती पक्षाची स्थापना केली. त्यांचीच पक्षाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
पाच वर्षांपूर्वी भाजप आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे रयत क्रांती संघटना स्थापन झाली होती. रविवारी आ. खोत सांगली जिल्ह्यात होते. त्यांनी भाजप खासदार संजयकाका पाटील यांची भेट घेतल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात सहभागी होते. त्याचवेळी त्यांचा मुलगा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रायरेश्वर येथे पक्ष स्थापन करत होते, पण याबाबत खोत यांनी कोठेही वाच्यता केली नाही.
रयत गोरगरिबांच्या प्रश्नांवर आंदोलन करत आहे. रस्त्यावरची लढाई करता करता आपला कार्यकर्ता लोकप्रतिनिधी म्हणुन सभागृहात देखील गेला पाहिजे. म्हणजे तो जनतेला अधिक वेगाने न्याय देऊ शकेल. म्हणुनच आज रयत क्रांती पक्षाची स्थापना करण्यात आली असे सागर खोत यांनी जाहीर केले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रायरेश्वर मंदिरात शंभू महादेवाचे दर्शन घेण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून शपथ घेण्यात आली. यावेळी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून कार्यकर्ते उपस्थित होते. भविष्यात रायरेश्वर येथे घेतलेली शपथ डोळ्यासमोर ठेवून रयतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम संघर्ष करु, असे कार्यक्रमात बोलताना अनेक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
यावेळी दीपक भोसले, लालासो पाटील, शिवनाथ जाधव, एन.डी. चौगुले, दीपक पगार, भानुदास शिंदे, निताताई खोत, सिमाताई पवार, प्रशांत ढोरेपाटील, सुनिल खोत उपस्थित होते.








