सर्वोच्च न्यायालयाकडून झटका – तुरुंगात आयुर्वेदिक उपचार मिळणार
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूंचा जामीन अर्ज फेटाळला आहे. अल्पवयीनावर बलात्काराप्रकरणी जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम यांनी आयुर्वेदिक उपचारावरून सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. पण न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळत तुरुंगातच आयुर्वेदिक उपचार दिले जावेत असे म्हटले आहे. आसाराम यांनी दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मागितला होता.
न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी, व्ही. रामसुब्रमण्यम आणि बेला एम. त्रिवेदी यांच्या खंडपीठाने याप्रकरणी सुनावणी केली आहे. पूर्ण प्रकरण पाहता हा सामान्य गुन्हा नाही, अशा स्थितीत जामीन दिला जाऊ शकत नाही. आसाराम यांना तुरुंगातच आयुर्वेदिक उपचार उपलब्ध केले जावेत असे खंडपीठाने म्हटले आहे.
आसाराम यांना 2013 साली जोधपूर पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत. 80 वर्षीय आसाराम यांनी कनिष्ठ न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत अनेकदा जामिनासाठी अर्ज केला आहे.









