आसाममधील अधिकारी-पोलिसांवरील गुन्हे मागे घेण्याची मिझोरामची तयारी
गुवाहाटी, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आसाम आणि मिझोराम या दोन्ही राज्यांमधील तणावाचे वातावरण आता हळूहळू थंड होताना दिसत आहे. दोन्ही बाजूंनी शांततेच्या माध्यमातून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीने एक-एक पाऊल मागे घेतल्याने तणाव निवळला आहे. कचर जिह्यातील आसाम-मिझोराम सीमेवर सोमवारी शांतता होती. दरम्यान, आसाममधील अधिकारी आणि पोलिसांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची तयारी मिझोरामने दर्शविली आहे.
आसाम आणि मिझोराम दोन ईशान्येकडील राज्यांमधील सीमा वादावर 26 जुलै रोजी झालेल्या चकमकीत आसामचे किमान 6 पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक ठार आणि 50 हून अधिक जखमी झाले होते. गेल्या आठवडय़ापासून सुरू असलेला हिंसाचार आता कमी झाला आहे. केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान मोठय़ा संख्येने राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालत असल्याने लैलापूर आणि आंतरराज्य सीमेवर परिस्थिती शांततेत राहिल्याचे वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले. ईशान्येतील राज्यांदरम्यान सुरू असलेल्या सीमा वादादरम्यान मिझोराम पोलिसांनी आसामचे 4 वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच 2 प्रशासकीय अधिकाऱयांसह 200 अज्ञात पोलिसांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. हे सर्व गुन्हे मागे घेणार असल्याची माहिती सोमवारी मिझोराम सरकारकडून देण्यात आली.
ईशान्येतील भाजप खासदार पंतप्रधानांच्या भेटीला
ईशान्येकडील राज्यांतील भारतीय जनता पक्षाच्या सर्व खासदारांनी आसाम-मिझोराम सीमेवरील हिंसाचारासह विविध मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याप्रसंगी भाजप खासदारांनी पंतप्रधानांना निवेदन सादर करत आसाम-मिझोराम सीमाप्रश्नाच्या मुद्यावर यशस्वी तोडगा काढण्याची मागणी केली. काही पक्षांचे नेते चिथावणीखोर विधाने करून हिंसा भडकवत असल्याचा दावा यावेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केला.
काँग्रेससारखे पक्ष राजकारण करत असून त्यांची प्रक्षोभक वक्तव्ये तणावात भर टाकत नसल्याचे चर्चेदरम्यान स्पष्ट केले. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अफवा पसरवल्या जात असून विदेशातूनही त्याला बळ मिळत असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. आसाम-मिझोराम सीमेवरील हिंसाचाराबाबत तणावपूर्ण वातावरण निर्माण करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांचा आम्ही निषेध करतो. ईशान्येकडील त्यांच्या 50 वर्षांच्या राजवटीत त्यांना या समस्येवर तोडगा सापडला नाही, पण आता ते आमच्यावर दोषारोप करत आहेत, असेही मतप्रदर्शन चर्चेदरम्यान करण्यात आले.









