सीमेवर शेतीवरून दोन्ही राज्ये आमनेसामने
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
ईशान्येतील राज्ये आसाम आणि मिझोराम यांच्यात सीमेवरून तणाव असताना स्थिती पुन्हा बिघडत आहे. आसामने राज्याच्या सीमेवर मिझोराम शेती विकसित करण्याच्या कृत्यावर आक्षेप घेतला आहे. तर मिझोरामने शेतकऱयांवरील पोलिसांच्या कारवाईची निंदा केली आहे.
आसामसोबत सीमा तणावादरम्यान कृषी विभाग सीमेवर शेतकऱयांना पूर्ण समर्थन देत आहे. कोलासिब आणि ममितमध्ये शेतकऱयांना 425 क्विंटल बटाटय़ाची बियाणे देण्यात आली आहेत. नाबार्डने सीमेवर शेतीयोग्य भूमी विकसित करण्यासाठी 7 कोटी रुपये मंजूर केल्याचे मिझोरामचे कृषीमंत्री लरिनासांगा यांनी म्हटले आहे.
कछार जिल्हा प्रशासन आणि आसाम पोलिसांच्या कारवाईची निंदा करतो. त्यांनी सीमेनजीक राहणाऱया शेतकऱयांच्या झोपडय़ा आणि पिके जाळून टाकली आहेत. कुठल्याही व्यक्तीची उपजीविका नष्ट करणे क्रूर कृत्य असल्याचे लरिनसांगा यांनी सांगितले आहे.
मिझोरामला शेती विकसित करण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करतो, परंतु त्यांनी हे स्वतःच्या हद्दीत करावे. मिझोरममधील लोकांनी आसामच्या भूमीवर 1.5 किलोमीटरपर्यंत कब्जा केला आहे. आम्ही त्यांना परत जाण्याची विनंती करत असल्याचे आसामचे वनमंत्री परिमल सुकलावैद्य यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी दोन्ही राज्यांमधील तणावामुळे केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला होता. राज्यांदरम्यान सीमेवरून वाद झाला आणि भडकलेल्या हिंसाचारात अनेक जखमी झाले होते.









