ऑनलाईन टीम / दिसपूर :
आसामच्या करीमगंज येथील पाथरकांडीचे भाजप उमेदवार कृष्णांदू पाल यांच्या बोलेरो गाडीत EVM मशीन सापडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे अहवाल मागवला आहे.
आसाम विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले. त्यानंतर भाजप उमेदवाराच्या गाडीत EVM मशीन सापडल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अतनू भुयान नावाच्या एका व्यक्तीने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, पाथरकांडी येथील भाजप उमेदवार कृष्णांदू पाल यांच्या गाडीतून ईव्हीएम मिळाल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण आहे.
दुसरीकडे काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने या मुद्द्यावर निर्णायक पावले उचलली पाहिजेत आणि सर्व राष्ट्रीय पक्षांनी EVM च्या वापराचे गांभीर्याने पुनर्मूल्यांकन करण्याची गरज आहे.