मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांची घोषणा
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी अफ्स्पा हा कायदा 2023 च्या अखेरपर्यंत राज्यातून मागे घेण्याचे लक्ष्य राखले आहे. सद्यकाळात आसामच्या 8 जिल्ह्यांमध्ये अफ्स्पा लागू आहे. आसाममध्ये हा कायदा पहिल्यांदा नोव्हेंबर 1990 मध्ये लागू करण्यात आला होता. यानंतर राज्यात आलेल्या प्रत्येक सरकारने सुरक्षा स्थितीचा आढावा घेत या कायद्याचा कालावधी सहा महिन्यांनी वाढविला आहे.
मागील वर्षी सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा 1985 (अफ्स्पा) आसामच्या 8 जिल्ह्यांमध्ये 6 महिन्यांसाठी वाढविण्यात आला होता. तर मागील वर्षी एक एप्रिलपासून राज्यातील 9 जिल्हे आणि एका जिल्ह्यातील उपविभाग वगळता उर्वरित पूर्ण राज्यातून अफ्स्पा मागे घेण्यात आला होता. 1 एप्रिल 2023 पासून अशांत क्षेत्रांमध्ये आणखी घट करत तो केवळ 8 जिल्ह्यांपुरती मर्यादित करण्यात आला होता.

किती राज्यांमध्ये कायदा लागू?
अफ्स्पा कायदा वेळोवेळी अनेक राज्यांमध्ये लागू करण्यात आला आहे. यात आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, पंजाब, चंदीगड आणि जम्मू-काश्मीर सामील आहे. परंतु काही काळानंतर अनेक ठिकाणांमध्ये अफ्स्पा पूर्णपणे हटविण्यात आला आहे. सद्यकाळात अफ्स्पा कायदा जम्मू-काश्मीर, नागलँड मणिपूरच्या काही क्षेत्रांमध्ये लागू आहे. याचबरोबर आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही हिस्स्यांमध्ये अफ्स्पा लागू आहे. तर त्रिपुरा, मिझोरम, मेघालयातून हा कायदा पूर्णपणे मागे घेण्यात आला आहे.









