प्रतिनिधी/ म्हापसा
कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी नुकतीच आसगाव पंचायतीमध्ये भेट घेऊन आसगावमधील पाणी पुरवठा संदर्भातील पाणी समस्याबाबत नागरिकांकडून माहिती जाणून घेतली. आसगाव गावातील पाणी पुरवठा सोडवू असे ठोस आश्वासन आसगाव वासियांना देत आसगावसाठी स्वतंत्ररीत्या पाच एमएलडी टाकीची व्यवस्था लवकरच करू असे सांगितले.
आसगाव पंचायतीत मंत्री लोबो यांनी भेट दिल्यावर नागरिकांच्या प्रश्नाना उत्तर देताना मंत्री मायकल लोबो यांनी वरील माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत आसगाव सरपंच हनुमंत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
कळंगूट आमदार तथा राज्याचे कचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी सध्या शिवोली विधानसभा मतदारसंघातील समस्यांकडे लक्ष देणे सुरू केले आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात आसगाव पंचायतीकडून ना हरकत दाखला’ मिळणे आवश्यक आहे असे कचरा वय्वस्थान मंत्री मायकल लोबो यांनी पंचसदस्यांसमोर स्पष्ट केले. त्यासंदर्भातील दाखला देण्याची तयारी आसगाव पंचायतीच्या वतीने बोलताना सरपंच हनुमंत नाईक यांनी दर्शविली आहे.
अनियमित तथा अपुऱया पाणीपुरवठय़ाच्या प्रशअनावर आसगाव पंचायत मंडळाच्या सदस्यांनी कैफियत मांडली असता कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी आसगाव पंचायतीला भेट दिली. त्यासंदर्भात झालेल्या चर्चेत आसगावचे सरपंच हनुमंत नाईक, उपसरपंच कार्तिक केळकर, पंचायत सदस्य ज्योकीम क्वाद्रोज, सागर नाईक, रिया नाईक, नियुक्त पंचायत सदस्य सुनील कोरगावकर यांनी भाग घेतला. यावेळी सार्वजनिक बांधाकम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. नेवरेकर उपस्थित होते. पंचसदस्यांनी यावेळी आसगाव पंचायत क्षेत्रात होणाऱया अनियमित तथा अपुऱया पाणीपुरवठय़ाच्या प्रश्नावर चर्चा केली.
तिळारी धरणाच्या कालवा शिवोलीमागे सोनारखेड आसगावपर्यंत येऊन नंतर हणजूण गावापर्यंत जाणार आहे. हणजूण येथे भूमिगत जलकुंभ उभारण्यात येणार असून तेथून ते पाणी शेतीसाठी उपलब्ध केले जाईल. त्यापैकी काही प्रमाणात पाणी आसगावमध्ये वळवून तिथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र त्या भूमिगत कालव्याचे काम केवळ आसगाव येथील श्री गणपती देवस्थान भागातील चार रस्ता परिसरापर्यंतच सध्या पूर्ण झाले आहे.
आसगाव पंचायत क्षेत्रातील नियोजित जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी सुमारे तीनशे चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन आवश्यक असून त्यासाठी आवश्यक जागा आसगाव पंचायतीने उपलब्ध करून दिल्यास तसेच त्यासंदर्भात आवश्यक असलेला ‘ना हरकत दाखला’ उपलब्ध करून दिल्यास त्या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर मार्गी लावणे शक्य होणार आहे असे मंत्री मायकल लोबो यांनी आसगाव पंचायतीच्या सदस्यांशी चर्चा करताना सांगितले. शासकीय पातळईवर आपण स्वतः त्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचेही मंत्री लोबो यांनी सरपंच हनुमंत नाईक यांच्याशी बोलताना सांगितले आहे. हा जलशुद्धीकरण प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला तर आसगाव व हणजूण भागातील पेयजलाचा प्रश्न कायमस्वरुपी संपुष्टात येईल असेही श्री. लोबो म्हणाले. आगामी काळात आसगावमधील अंतर्गत भागात छोटय़ा आकाराच्या जलवाहिन्या उभारून पाणीपुरवठय़ाचा प्रश्न सोडविण्यात येईल असेही श्री. लोबो म्हणाले.
आसगावचे सरपंच हनुमंत नाईक यांनी सांगितले की, शिवोलीचे आमदार आसगावमधील पाणीपुरवठय़ाचा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांनी या प्रश्नाकडे आतापर्यंत कदापी गांभीर्याने लक्ष दिलेच नाही. स्थानिक अआमदार पालयेकर यांनी कदाचित या प्रश्नासंदर्भात थोडेफार प्रयत्न केले असण्याचीही शक्यता आहे मात्र ती समस्या सोडविण्यात त्यांना अद्याप यश आले नाही ही वस्तुस्थिती आहे असे श्री. नाईक म्हणाले.
मंत्री मायकल लोबो म्हणाले की, आसगाव म्हापसा येथे डीएम्स कॉलेजच्या परिसरात सध्या मोठी टाकी अस्तित्वात आहे. त्या टाकीच्या बाजूला तिच्या दुप्पट आकाराची आणखीन एक मोठी टाकी उभारण्यात येणार आहे, त्यासंदर्भातील सुमारे 75 टक्के काम पूर्णत्वास आले असून केवळ निविदा जारी करणे तेवढे बाकी आहे. येत्या 2-3 महिन्यात निविदा जाहीर केल्यानंतर कामासंदर्भातील आदेश सरकारच्या वतीने दिला जाईल. त्यानंतर आसगाव व हणजूण भागातील पाण्याचा प्रश्न कायमचा संपुष्टात येईल.









