वृत्तसंस्था/ बीजिंग
2023 साली होणाऱया 18 व्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद चीन भूषविणार आहे. सदर स्पर्धा 16 जून ते 16 जुलै 2023 या कालावधीत होणार असल्याची माहिती आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनने गुरुवारी दिली आहे.
या स्पर्धेत यजमान देशासह एकूण 24 संघांचा सहभाग राहील. सदर स्पर्धा 31 दिवस चालणार असून स्पर्धेतील सामने चीनमधील विविध दहा शहरांमध्ये खेळविले जातील. यापूर्वीची म्हणजे 17 वी आशिया चषक फुटबॉल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये भरविली गेली होती. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेचे दुसऱयांदा यजमानपद चीन भूषवित आहे. यापूर्वी म्हणजे 2004 साली ही स्पर्धा चीनमध्ये घेण्यात आली होती. आशियाई फुटबॉलच्या इतिहासामध्ये चीनमधील ही आगामी स्पर्धा सर्वात मोठी राहील, असे विंडसर जॉन यांनी सांगितले. कतार या स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे.









