वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविणाऱया भारताच्या बिश्वामित्र चोंगथमने दुबईत सुरू असलेल्या आशियाई युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले. भारतीय बॉक्सर्सनी या स्पर्धेत पदकांची लयलूट करीत वर्चस्व राखले आहे.
51 किलो वजन गटाच्या अंतिम लढतीत चोंगथमने उझ्बेकच्या कुझिबोएव्ह अहमदजॉनचा कडवा प्रतिकार मोडून काढत 4-1 असा पराभव केला. मात्र 48 किलो वजन गटाच्या अंतिम लढतीत भारताच्या विश्वनाथ सुरेशला वर्ल्ड चॅम्पियन कझाकच्या सांझार ताश्केनबेकडून 0-5 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी, कनिष्ठ विभागात भारताच्या मुलींनी सहा सुवर्णपदकांची भर घातली. या विभागात भारताला एकूण 8 सुवर्ण, 5 रौप्य व 6 कांस्यपदके मिळाली. अंतिम फेरीत एकूण 10 मुलींनी प्रवेश मिळविला होता. त्यापैकी सहा जणांनी सुवर्णपदके पटकावली तर चौघींना रौप्य मिळाले.
मुलांच्या गटात अंतिम फेरी गाठलेल्या तीनपैकी दोघांनी सुवर्ण मिळविले तर एकाला रौप्य मिळाले. भारताने पॉवरहाऊस मानल्या जाणाऱया कझाकइतकीच सुवर्णपदके मिळविली. आणखी एक पॉवरहाऊस उझ्बेकिस्तानने त्यांच्यापेक्षा एक सुवर्ण जादा मिळविले आहे. रविवारी रोहित चामोली (48 किलो), भरत जून (81 किलोवरील), विशू राठी (48 किलो, मुली), तनू (52 किलो, मुली) यांनी सुवर्णपदके मिळविली होती. रविवारी उशिरा झालेल्या लढतीत निकिता चंद (60 किलो), माही राघव (63 किलो), प्रांजल यादव (75 किलो), कीर्ती (81 किलोवरील) या मुलींनी नंतर सुवर्णपदके मिळविली.
कीर्तीने कझाकच्या शुगीला रीसेबेचा 4-1, माही राघवने कझाकच्या अल्जेरिम कबडोल्डाचा 3-2, निकिता चंदने कझाकच्या आसेम तनातरचा, प्रांजल यादवने कझाकच्या अखझानचा 4-1 असा पराभव केला. रुद्रिकाला (70 किलो) उझ्बेकच्या ओयशा टोइरोव्हाकडून 0-5, संजनाला (81 किलो) कझाकच्या उमित अबिलकायरकडून 0-5, आंचल सैनीला (57 किलो) कझाकच्या उल्झान सार्सेनबेककडून 0-5 असा पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांना रौप्यपदक मिळाले. भारताला सहा कांस्यपदके देविका घोरपडे (50 किलो, मुली), आरझू (54 किला। मुली), सुप्रिया रावत (66 किलो, मुली), आशिष (54 किलो), अन्शुल (57 किलो), अंकुश (66 किलो) यांनी मिळवून दिली.
2019 मध्ये संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या याआधीच्या आशियाई कनिष्ठ चॅम्पियनशिपमध्ये भारताने 21 पदके (6 सुवर्ण, 9 रौप्य, 6 कांस्य) पटकावत तिसरे स्थान मिळविले होते. येथील स्पर्धेत निवेदिता (48 किलो), तमन्ना (50 किलो), सिमरन (52 किलो), नेहा (54 किलो), प्रीती (57 किलो), प्रीती दहिया (60 किलो), खुशी (63 किलो), स्नेहा (66 किलो), खुशी (75 किलो), तनिशबिर (81 किलो) या महिला अंतिम फेरीत खेळणार आहेत तर जयदीप रावत (71 किलो), वंशराज (64 किलो), विशाल (80 किलो) हे पुरुष विभागात अंतिम फेरीत खेळणार आहेत.









