वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सहा वेळची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरी कोम पुढील महिन्यात येथे होणाऱया आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप्समध्ये भारताची प्रमुख आव्हानवीर असेल. येथील इंदिरा गांधी क्रीडा संकुलात ही स्पर्धा होणार असल्याचे भारतीय बॉक्सिंग फेडरेशनच्या (बीएफआय) एका पदाधिकाऱयाने सांगितले.
गेल्या आठवडय़ाच्या अखेरीस नवी दिल्लीत ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट नसलेल्या वजन गटासाठी राष्ट्रीय निवड चाचणी बीएफआयने आयोजित केली होती. मात्र मेरी कोमसह (51 किलो गट) चार महिला बॉक्सर्सना या चाचणीत सहभागी न होण्याची सवलत देण्यात आली होती. त्यात सिमरनजित कौर (60 किलो), लवलिना बोर्गोहेन (69 किलो), पूजा रानी (75 किलो) यांचा समावेश आहे. हरियाणाच्या मोनिकाला 48 किलो गटासाठी निवडण्यात आले तर साक्षी 54 किलो गटात भारताचे प्रतिनिधित्व करेल. जस्मिन (57 किलो), पी. बसुमातरी 64 किलो), स्वीटी बोरा (81 किलो), अनुपमा (81 किलोवरील) यांचीही विविध गटासाठी निवड करण्यात आली आहे.
‘सर्व बॉक्सर्स बायो बबलमध्ये असल्याने त्यांना स्टेडियमबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही,’ असे बॉक्सिंग पथकाच्या प्रशिक्षकांनी सांगितले. गेल्या महिन्यात स्पेनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टोकियोसाठी पात्र ठरलेल्या भारतीय बॉक्सर्सनी भाग घेतला होता. त्यानंतर तुर्कीमध्ये झालेल्या निमंत्रितांच्या स्पर्धेसाठी बीएफआयने दुय्यम संघ पाठविला होता.









