वृत्तसंस्था/ कौलालंपूर
आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या विद्यमान विजेत्या कतारने 2027 मध्ये होणाऱया स्पर्धेच्या यजमानपदासाठी बुधवारी अधिकृतपणे अर्ज दाखल केला असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
तिसऱयांदा या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळेल, अशी आशा त्यांना वाटत आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी आणखी चार देशांनी स्वारस्य दाखविले असून त्यात भारत, इराण, सौदी अरेबिया व उझ्बेकिस्तान यांचा समावेश असल्याचे आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनने (एएफसी) सांगितले. पुढील वर्षी या स्पर्धेच्या यजमानाची घोषणा करण्यात येणार आहे. कतारमध्ये 2022 ची फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धाही होणार आहे. यापूर्वी त्यांनी 1988 व 2011 मध्ये आशियाई चषक स्पर्धेचे आयोजन केले होते. 2019 मध्ये झालेल्या स्पर्धेत कतारने जेतेपद मिळविले असून त्या वर्षी स्पर्धेचा विस्तार करून 16 ऐवजी 24 संघांना सामील करून घेण्यात आले होते. पुढील आशियाई चषक स्पर्धा चीनमध्ये 2023 मध्ये होणार आहे.









