प्रतिनिधी / सांगली
आशा व गटप्रवर्तक यांच्या बेमुदत संप प्रकरणी तोडगा काढण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात कामगार संघटनांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्य सरकारतर्फे आशा व गटप्रवर्तक यांना दरमहा एक हजार रुपये मानधन वाढीचा प्रस्ताव सरकारतर्फे देण्यात आला. महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने हा प्रस्ताव मान्य नसल्याचे सांगत फेटाळला व भरीव वाढ देण्याचा आग्रह धरला.
राज्य सरकारतर्फे योग्य असा प्रस्ताव आरोग्यमंत्री यांनी न दिल्याने संप यापुढेही चालू ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. दरम्यान आयटक कामगार संघटनेच्यावतीने असा निर्णय घेण्यात आलेला आहे की, संपूर्ण राज्यभर उद्यापासून आंदोलन तीव्र करावे. त्याचबरोबर शक्य असेल त्या ठिकाणी आमदार-खासदारांना जाऊन निवेदने द्यावीत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा परिषदवर निदर्शने करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीस सरकारच्यावतीने माननीय आरोग्य मंत्री राजेश टोपे, अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, डॉ. रामदास स्वामी व कृती समितीचे एम. ए. पाटील, कॉ. शंकर पुजारी, डॉ. डी. एल. कराड, भगवानराव देशमुख, कॉ. राजू देसले, कॉ. शुभा शमीम, कॉ. श्रीमंत घोडके, कॉ. सुवर्णा कांबळे , कॉ. राजेश सिंग हे उपस्थित होते.