प्रतिनिधी / कोल्हापूर
आशा व गटप्रवर्तकांच्या विविध प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी लवकरच मुंबईत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या शिष्टमंडळास दिले. यावेळी युनियनच्या वतीने मानधन वाढ व विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन मंत्री मुश्रीफ यांना देण्यात आले.
जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या कागल तालुका अध्यक्षा मनिषा पाटील व जिल्हा सचिव उज्वला पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्री मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी आशा व गटप्रवर्तकांचे मानधन वाढ करावी, सेवेत कायम करून किमान वेतन श्रेणी लागू करावी. प्रतिदिन 300 रुपये भत्ता मिळावा, गटप्रवर्तकांना पुर्ववत 625 रुपये भत्ता मिळावा, दिपावली भाऊबीज म्हणून 2 हजार रुपये प्रोत्सहान भत्ता मिळावा, 50 लाख रुपयांचा संरक्षण विमा उतरवावा, अशा विविध प्रलंबित मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावर मंत्री मुश्रीफ यांना कोरोनाच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देणाऱया आशा व गटप्रवर्तकांच्या माधनवाढीसह प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी लवकरच मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिले.यावेळी संघटनेच्या सचिव सुप्रिया गुदले, कॉ. शिवाजी मगदूम, विद्या भोबाटे यांच्यासह आशा कर्मचारी उपस्थित होत्या.









