प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे उद्योग व्यवसाय बंद झाले आहेत. कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरीब कुटुंबांना आशादीप फौंडेशनच्यावतीने गेल्या वर्षभरापासून अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. नुकतेच आनंदनगर-वडगाव येथेही गरीबांना आशादीप फौंडेशनचे हणमंत कुगजी यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले आहे.
येळ्ळूर गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिध्द अभियंता हणमंत कुगजी यांनी गरीब कुटुंबांना नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. कधीही प्रसिध्दीसाठी पुढाकार न घेता केवळ मदत करुन माणुसकीचे दर्शन त्यांनी आशादीप फौंडेशनच्या माध्यमातून घडविले आहे. आनंदनगर-वडगाव येथील शिवमंदिरांमध्ये त्यांनी या अन्नधान्याचे वाटप केले. आनंदनगर रहिवासी संघटनेचे अध्यक्ष मल्लाप्पा कुंडेकर यांच्या उपस्थितीत त्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवहिंद सोसायटीचे माजी चेअरमन प्रदीप मुरकुटे, आनंदनगर रहिवासी संघटनेचे सेपेटरी संतोष पवार, आप्पाजी कुगजी, आशादीपचे परशराम खेमणाकर चंद्रकांत धुडूम, बाळू तम्मुचे, अमृत मिरजकर आदी उपस्थित होते. प्रा. सी. एम. गोरल यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अभियंते हणमंत कुगजी यांनी केलेल्या कार्याचा गौरव करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. आशादीप ग्रुपचे सदस्य परशुराम खेमणाकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आनंदनगर येथील 11 कुटुंबांना तांदुळ, गहू, तुरडाळ, हरभरा डाळ, गुळ, तिखट यासह जीवनावश्यक कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी बाळू तमूचे, अमृत मिरजकर आदी उपस्थित होते.









