सोमवारपासून सुरु होतेय सोलापूर-पुणे विशेष गाडी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच रेल्वे प्रशासनाने पुण्याला जाण्यासाठी आठवड्यातून पाच दिवसांसाठी विशेष गाडी सुरु केली आहे. सोलापूर-पुणे रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून दोन्ही शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी रेल्वे प्रशासनासोबतच प्रवाशांनाही दक्षता घ्यावी लागणार आहे.
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हुतात्मा एक्स्प्रेस सुरु करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच रेल्वे प्रशासनाने 1 मार्चपासून सोलापूर-पुणे-सोलापूर ही सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस आठवड्यातील पाच दिवसांसाठी चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही हुतात्मा एक्सप्रेसच आहे पण सध्या या गाड्यांना विशेष रेल्वे असे नाव देण्यात आले आहे.
मध्य रेल्वेने सोलापूर विभागातील प्रवाशांच्या मागणीनुसार आणि सुविधासाठी सोलापूर-पुणे गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 1 मार्च 2021 पासून गाडी क्र. 01158/01157 सोलापूर-पूणे-सोलापूर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे. सोलापूर शहर आणि जिह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. अशा वातावरणात सोलापूर-पुणे विशेष गाडी सुरु करणे योग्य आहे का? असा सवाल विचारला जात आहे. या गाडीमुळे सोलापूर-पुणे या दोन्ही शहरात रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहेच. पण प्रवाशांनीही काळजी घेणे आवश्यक आहे.
प्रवाशांनी मास्क अन्य सूचनांचे पालन करावे
– प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे
सोलापूर रेल्वे स्थानकावरुन मुंबईसह इतर ठिकाणी जाण्यासाठी जवळपास 70 टक्के विशेष गाड्या चालू आहेत. आता 1 मार्चपासून पुण्यासाठी विशेष गाडी सुरु होत आहे. पॅसेंजर गाड्या अद्याप सुरु केल्या नाहीत. विशेष गाड्यांमध्ये आरक्षित प्रवाशांनाच प्रवास करता येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता प्रशासनाकडून घेतली जात आहे. प्रवाशांनीही मास्क आणि इतर सुचनांचे पालन करावे. जर कोणी आजारी असेल तर प्रवास टाळावा.