‘ऑपरेशन हस्त’ : भाजप हायकमाडंची राज्यातील नेत्यांना सूचना
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य काँग्रेसकडून ‘ऑपरेशन हस्त’ राबविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे ‘ऑपरेशन हस्त’ला लगाम घालण्यासाठी भाजप हायकमांडने एन्ट्री केली आहे. पक्ष सोडण्यासाठी तयार असलेल्या काही आमदारांना पक्षांतर करण्यापासून रोखावे. मात्र, आवाक्याबाहेर असणाऱ्या पक्षांतरीत आमदारांच्या बाबतीत डोकेदुखी करून घेऊ नका. लोकसभा निवडणुकीवर अधिक लक्ष केंद्रीत करा, अशी सूचना भाजप हायकमांडने राज्यातील नेत्यांना दिली आहे.
बेंगळूरमध्ये सोमवारी पार पडलेल्या राज्य भाजप कार्यकारिणी बैठकीत ऑपरेशन हस्तविषयी चर्चा केल्यानंतर वस्तूस्थितीचा अहवाल केंद्रातील भाजप नेत्यांकडे पाठविण्यात आला होता. हायकमांडने हा अहवाल पडताळून राज्यातील नेत्यांना काही सल्ले दिले. पक्ष सोडण्याच्या तयारीत असणाऱ्यांची एका विशिष्ट टप्प्यापर्यंत समजूत काढण्याचा प्रयत्न करा. हतबत होईस्तोवर प्रयत्न करू नका. निष्ठावंत कार्यकर्ते पक्षातच राहतील, याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना भाजप हायकमांडने राज्य भाजप नेत्यांना दिल्या आहेत.
अधिकारासाठी पक्ष सोडून आलेले पुन्हा अधिकारासाठी मूळ पक्षात परतण्याची शक्यता आहे. अशा नेत्यांची पक्षनिष्ठा किती आहे, हे जाणून घ्या. त्यांच्याविषयी अधिक डोकेदुखी करून घेण्याची गरज नाही. राजकारणात अशा घडामोडी घडतच असतात. निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षसंघटना मजबूत करण्यास प्राधान्य द्या. राज्यात भाजपचे सरकार असताना सत्ता उपभोगलेल्या नेत्यांमुळे पक्षातील कार्यकर्ते पेचात सापडले आहेत. पक्षासाठी कार्यकर्तेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पक्षांतरीत नेत्यांच्या बाबतील अधिक काळजी करू नका. पक्ष सोडण्याच्या तयारीत असणाऱ्या नेत्यांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्त्व निर्माण करा, अशा सूचनाही हायकमांडने राज्य भाजप नेत्यांना दिल्या आहेत.
एस. टी. सोमशेखरना दिल्लीभेटीचे निमंत्रण
पक्षांतर करणार नसल्याचे सांगणारे माजी मंत्री एस. टी. सोमशेखर मूळ पक्षात जाण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, वेळीच सावध झालेल्या भाजपश्रेष्ठींनी एस. टी. सोमशेखर यांना दिल्लीभेटीचे निमंत्रण पाठविले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा आणि पक्षाचे संघटना सचिव बी. एल. संतोष यांनी सोमशेखर यांना 29 ऑगस्ट रोजी दिल्लीला येण्याची सूचना केली आहे.









