निर्यात करण्याची अनुमती देण्याची मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात मास्कचे उत्पादन गरजेपेक्षा अधिक प्रमाणात झाले आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय उपकरण निर्मिती उद्योगाने उर्वरित उत्पादनाची निर्यात करण्याची करण्याची अनुमती देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. सरकारने बिगर-एन95 मास्कच्या निर्यातीवरील बंदी हटविण्याची गरज आहे. या निर्णयामुळे उत्पादकांना स्वतःचा साठा बाहेर काढण्यास मदत मिळण्यासह उत्पादन पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकणार असल्याचे उद्योगक्षेत्राचे म्हणणे आहे.
कोविड-19 महामारी फैलावादरम्यान सरकारने मार्चमध्ये सर्वप्रकारच्या मास्कच्या निर्यातीवर बंदी लादली होती. मागील महिन्यात सरकारने वैद्यकीय तसेच सर्जरीत वापरले जाणारे मास्क वगळता इतरांच्या निर्यातीला मंजुरी दिली होती. यात सूती, रेशमी, लोकरी आणि विणकाम असलेले मास्क सामील आहेत.
कोविड-19 महामारी फैलावल्यावर देशात मास्कचे उत्पादन प्रचंड वेगाने वाढले आहे. देशात सध्या उत्पादन शिल्लक राहत असल्याने निर्मात्यांना पूर्ण क्षमतेचा वापर करता येत नसल्याची स्थिती आहे. एन95 वगळता शस्त्रक्रियेत वापरल्या जाणाऱया 3 आवरणांच्या मास्कच्या निर्यातीला अनुमती दिली जावी अशी मागणी करणारे पत्र भारतीय वैद्यकीय उपकरण उद्योगाने सरकारला लिहिले आहे.
देशांतर्गत मागणी सहजपणे पूर्ण करता येईल इतकी क्षमता उत्पादकांकडे आहे. उर्वरित साठय़ामुळे उत्पादकांनी मागील 15-20 दिवसांपासून निर्मिती प्रक्रिया रोखली आहे किंवा ती मंद केल्याचे उद्योगक्षेत्राने पत्रात नमूद केले आहे.









