गौरव गुरव/ देवरुख
देवरुख मातृमंदिर संस्थेच्यावतीने ओझरेखुर्द येथे संशोधनात्मक प्रात्यक्षिक म्हणून यावर्षी सुमारे 30 गुठय़ावर कलिंगडाचा मळा फुलवत संस्थेने यावर्षी 10 टन उत्पादन घेतले आहे. देवरुख येथील संस्थेच्या कार्यालयासमोर सेल्फ सर्व्हिस पध्दतीने या कलिंगडांची विक्री करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ग्राहकानेच आपल्या आवडीचे कलिंगड निवडून त्याचे पैसे त्या ठिकाणी ठेवलेल्या पेटीत टाकायचे आहेत. या आगळ्यावेगळ्या विक्रीपध्दतीची जोरदार चर्चा व कौतुक परिसरात सुरु आहे.
या बाबत संस्था उपाध्यक्ष व कृषीतज्ञ विलास कोळपे यांच्याशी संवाद साधला असता या विक्री स्टॉलवर कोणताही संस्थेचा कर्मचारी नाही. केवळ ग्राहकांच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून हा स्टॉल देवरुख येथील मातृमंदिर कार्यालयासमोर उभा करण्यात आला आहे. परदेशामध्ये अशा पध्दतीचा वापर केला जातो. ही संकल्पना आपल्या शहरात राबवण्याच्या हा संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेला हा पहिला प्रयत्न आहे. याला ग्राहकवर्गातून प्रतिसादही मिळत असल्याचे कोळपे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
कासारकोळवण येथील प्रगतशील शेतकरी धनंजय मांगले व ग्रीन ऍग्रोटेक भाऊ खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था उपाध्यक्ष कृषीतज्ञ विलास कोळपे, प्रा. समीर जाधव यांच्यासह कर्मचारी, विद्यार्थी यांचे या प्रकल्पात महत्त्वाचे योगदान लाभत आहे. साधारणपणे 30 गुंठे जागेमध्ये मेलोडी व आगस्टा या जातीच्या कलिंगडांची लागवड येथे करण्यात आली होती. 5 जानेवारी रोजी ही लागवड करण्यात आली असून साधापणतः 70 दिवसात हे फळ तयार झाले आहे. यासाठी सेंद्रीय खतांचा वापर व उत्तम पाणी व्यवस्थापन करण्यात आले आहे. या पिकाच्या जोडीला 5 गुंठय़ामध्ये काकडीची लागवड करण्यात आली. दिवसाला 20 किलो इतके काकडी विक्रीसाठी उपलब्ध होत आहे.
कलिंगडाच्या लागवडीसाठी 6 मजुरांनी तसेच फळधारणेनंतर काढणीसाठी 15 मजुरांनी परिश्रम घेतले. अल्पदरात ही कलिंगडे ग्राहकांना स्थानिक पातळीवर उपलब्ध होत असल्याने ग्राहकांमधून यासाठी मागणी वाढत आहे. या कल्ंिांगड लागवडीतून प्रा. मधु दंडवते कृषी विद्यालय सलग्न व यावर्षी हाती घेण्यात आलेला हा कृषी प्रयोग परिसरातील शेतकरी व कृषी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
कलिंगड कापून वाढदिवस
देवरुखमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून युवा वर्गाला प्रेरणा देणारे सरताज कापडी यांनी आपला वाढदिवस मातृमंदिर गोकुळ बालिकाश्रमात मातृमंदिर शेतीफार्मवरील कलींगड कापून वाढदिवस साजरा केला. शेतकरावर्गाला उभारी देण्यासाठी हा उपक्रम राबवला गेला. यावेळी मुलींना भेटवस्तू देण्यात आल्या.









