वार्ताहर/ मांजरी
आषाढ वारीत अंकलीकर शितोळे सरकार यांच्याकडे मानाचे अशव, माऊलींच्या तंबूचा मान असून वारीच्या काळातील सर्व धार्मिक विधी आळंदी येथे पूर्ण करण्यात येत आहेत. आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका विविध दिंडय़ांच्या सहभागात आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवषी जात असतात. गेल्या वर्षापासून कोरोना महामारीमुळे या वारीच्या धार्मिक विधीमध्ये खंड पडला तरी प्रतिकात्मक स्वरूपात या विधी पूर्ण करण्यात येत आहेत. आषाढी वारीच्या धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात माऊलींच्या अश्वाच्या प्रस्थान सोहळय़ाने होत असते.
गतवषी लॉकडाऊन काळात अंकली येथे वारी काळातील धार्मिक विधी पार पडले होते. यावेळी मात्र माऊलींच्या अश्वासह सर्व लवाजमा आळंदी येथे वास्तव्यास असल्याने माऊलींचे अजोळ घर गांधीवाडा येथे सर्व धार्मिक विधी सुरू आहेत. वारीकाळात माऊलीचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी शितोळे सरकार यांचा मानाचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्याच बरोबर वारीकाळात विविध भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होत असतात. गांधीवाडा येथे सध्या हे सर्व धार्मिक विधी परंपरेनुसार सुरू आहेत.
अंकलीच्या श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या घराण्याकडे असलेल्या अश्वासह जरीपटका व नैवेद्याचा हा मान शितोळे सरकार यांच्याकडून श्रद्धेने जपला आहे. आळंदी येथे त्यास चालना देण्यात आली आहे.
अश्वांचा मुक्काम आळंदीत
आषाढ वारीत माऊलींच्या अश्वांचा रिंगण सोहळा प्रत्येक वारकऱयाच्या जिव्हाळय़ाचा विषय असतो. चालून थकलेल्या वारकऱयांच्या मनाला चैतन्य देण्याचे काम हा रिंगण सोहळा करत असतो. यावेळी रिंगण सोहळा होणार नसला तरी माऊलींचे अश्व आळंदी येथे वास्तव्यास राहिले आहे. अश्वाचे सेवेकरी तुकाराम कोळी, अक्षय परीट, गणपती ढंग, सुरज शितोळे, रामू बुदले, राजू हवालदार, श्रावण कोळी, सुमित शिंदे, नारायण निबंदे, हणमंत गुरव आदी शितोळे सरकारांच्या आधिपत्याखाली धार्मिक विधीस चालना देत आहेत.









