अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार 16 ऑगस्ट 2021, सकाळी 10.10
● खटाव, फलटणमध्ये आकडे वाढले ● बाधितांपेक्षा कोरोना मुक्तीची संख्या जास्त ● ग्रामीण भागात लस पोहचेना ● कोरोना तपासणीची सक्ती कायम ● रविवारी 569 जण नव्याने बाधित ● पर्यटन स्थळे ओसंडून वाहिली ● जमाव वाढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
सातारा / प्रतिनिधी :
स्वातंत्र्य दिनाला लागून आलेली सुट्टी पर्यटनस्थळे ओसंडून वाहायला कारणीभूत ठरली. तपासण्या कमी झाल्याने सोमवारचा आकडा 600 च्या आत येऊन आलेख खाली आला असला तरी गांभीर्य कमी झालेले नाही. उन्ह पावसाचा खेळ सुरू असून कोरोनासह अन्य संसर्ग होऊन लोक आजारी पडत आहेत. त्यामुळे अन्य आजारांकडे लक्ष देण्याची गरज असली तरी आरोग्य यंत्रणा त्याबाबत तोकड्या पडत आहेत.
जिल्ह्यातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या खटाव आणि फलटण तालुक्यातील बाधित संख्या आणि कोरोनामुळे मृत्यू येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. ग्रामीण भागात लस वेळेवर पोहचत नाही. गावेच्या गावे लसीकरणापासून वंचित आहेत. बाधितापेक्षा कोरोनावर मात केलेल्याची संख्या जास्त आहे. कोरोना तपासणीची सक्ती कायम असून ज्यांना त्रास होतोय त्यांचीच तपासणी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. कालच्या 24 तासात 95,39 जणांची तपासणी करण्यात आली असून 569 एवढे बाधित आढळून आले.
पॉझिटिव्हीटी 5.96 अन् बाधित 569
दररोज होणाऱ्या जिल्ह्यातील तपासण्या या 12 हजाराच्या आसपास होत आहेत. काल स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर या तपासण्या 9539 एवढ्या झालेल्या आहेत. त्यामुळे कालच्या दिवसभरात झालेल्या तपासणीमध्ये तब्बल अडीच हजाराने कमी तपासणी झालेल्या आहेत. त्यामध्ये आढळून आलेल्या बाधित संख्येमध्ये प्रामुख्याने सातारा, कराड, फलटण, खटाव या चार तालुक्यातील अनुक्रमे यांचा समावेश आहे. फलटण आणि खटाव तालुक्यातील वाढत चाललेली बाधित आणि मृत्यू संख्या चिंतेची बाब बनू लागली आहे.
ग्रामीण भागात लसीकरणाकडे नजरा
कोरोना होऊ नये, आपला जीव वाचावा, पूर्वी सारखे सर्व काही सुरळीत व्हावे असे प्रत्येकाला वाटत आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे, असे शासन सांगते आहे. जिल्ह्यातील अनेक गावे, वाड्या, वस्त्यावर अजुन लस पोहचली नाही. ज्या गावात लस पोहते त्या गावातल्या मोजक्या पुढाऱ्यांच्या घरातील 100 जणांना लस मिळते. बाकीच्यांना लस कधी मिळणार असा प्रश्न असतो तर दुसरे शिबिर कधी लागेल याची ही शक्यता लवकर नसते. कोरोना तपासणीचे शिबिर राबवले की गाव पुढारी मागे अन सर्वसामान्य पुढे असे चित्र गाव पातळीवर आहे. तसेच ग्रामीण भागात ज्यांना लक्षणे आहेत त्यांचीच कोरोना तपासणी व्हावी अशी मागणी होत आहे.
सोमवारपर्यंत एकूण नमूने…… 15,89,235,एकूण बाधित……2,30,798, घरी सोडण्यात आलेले…..2,16,334, मृत्यू ….. 5,592, उपचारार्थ रुग्ण……10,828









