पुन्हा घरवापसी करणार
प्रतिनिधी /मडगाव
आपण अवघ्याच समर्थकांना विश्वासात घेऊन तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र, आत्ता मतदारांची गाठभेट घेत असताना, आपले मतदार प्रचंड नाराज झाल्याचे सर्वत्र आढळून येत आहे. मतदार तसेच हितचिंतक, मित्र परिवार व कुटुंबियांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची सूचना केली असून आपण पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी दिली. यावेळी त्यांनी कुडतरीच्या तमाम जनतेची जाहीररित्या माफी मागितली.
तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करताना आपल्या काही अपेक्षा होत्या. मात्र, त्या पूर्ण झाल्या नाहीत. काँग्रेस पक्षाबरोबर युती करण्यात देखील तृणमूल काँग्रेसला यश आलेले नाही. त्याच बरोबर मतदारांनी तृणमूल काँग्रेस पक्ष हा स्थानिक नसल्याने, बाहेरच्या पक्षाला मतदान करून मत विभागणी होईल व त्याचा लाभ भलत्याच व्यक्तींना होईल अशी भीती आपल्या समर्थकांनी व्यक्त केली आणि पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची विनंती केली. त्यानुसार आपण पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जनमत कौल दिवसाचे औचित्य साधून आपले असंख्य समर्थक आपल्याला भेटायला आले व त्यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यास सांगितले. त्या प्रमाणे रविवारी आपण राजीनामा दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
काँग्रेस मध्ये प्रवेश पण…
आपण मतदारांच्या विनंतीनुसार काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, काँग्रेस पक्षाने बंडखोरांना पुन्हा प्रवेश दिला जाणार नसल्याची घोषणा केली आहे. हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स काहीसे गोंधळले. आपण तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करताना कुणाबद्दल वाईट बोललो नव्हतो. आपली काँग्रेस पक्षाकडे बोलणी झालेली नाही. मात्र, मायकल लोबो यांनी आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करावा असे ट्विट केले आहे. परंतु, मायकल लोबो हे काँग्रेस पक्षात नवीन असून ते कसा काय निर्णय घेऊ शकतात असा सवाल पत्रकारांनी केला असता. आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स काहीच बोलू शकले नाही.
दरम्यान, मायकल लोबो हेच आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात यावे यासाठी कार्यरत होते. गेले काही दिवस ते त्यांच्या संपर्कात होते. रेजिनाल्ड यांना कुडतरीत मतदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी शेवटी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
आपण दावा सोडलेला नाही : शॉलम सार्दिन
आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खा. फ्रान्सिस सार्दिन यांचा मुलगा शॉलम सार्दिन यांनी कुडतरीत आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. आत्ता रेजिनाल्ड पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याने, आपण काय करणार असा सवाल शॉलम यांना केला असता, आपण माघार घेतली नाही. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी आपला दावा कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षाचे ज्येष्ठ नेते आपल्याला संधी देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपण सुशिक्षित असून लोकांनी आपल्या विकासकामे करण्याची एक संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. जर आपण आमदार म्हणून अपयशी ठरलो तर पुन्हा निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी सांगितले.









