घरवापसीची दारे केली पुर्णतः बंद : उमेदवारी देऊनही गेले होते टीएमसीत,डतरीची उमेदवारी मोरेनो रिबेलोंना
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर धक्का देऊन पक्षत्याग करून तृणमूल काँग्रेस पक्षात गेलेले आणि तृणमूलचा राजीनामा देऊन पुन्हा काँग्रेस पक्षात येण्याचा प्रयत्न करणाऱया आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा पत्ता कट करून काँग्रेसने त्यांना धडा शिकविला आहे. त्याजागी मोरेनो रिबेलो यांना उमेदवारी दिली. हा रेजिनाल्ड यांच्यासाठी काँग्रेसने दिलेला मोठा हादरा आहे. बहुतांश काँग्रेसजनांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे.
काँग्रेस पक्षाने बुधवारी आणखी पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. अखिल भारतीय काँगेसचे सरचिटणीस मुकूल वासनिक यांनी ही यादी दिल्लीहून जाहीर केली आहे. यामध्ये आलेक्स रेजिनाल्ड यांनी काँग्रेसशी केलेल्या गद्दारीनंतर आता त्यांचे नाव यादीतून रद्दबातल ठरविले आहे. काँग्रेस पक्षाने जी पहिली यादी जाहीर केली होती, त्यात आलेक्स रेजिनाल्ड यांना कुडतरीची उमेदवारी जाहीर केली होती, असे असताना देखील काँग्रेसच्या उमेदवारीला कचऱयाची टोपली दाखवून रेजिनाल्ड यांनी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
तृणमूल प्रवेश प्रकरण त्यांना महागात गेले. तृणमूलमधून बाहेर पडून पुन्हा काँग्रेसकडे येऊ पहाणाऱया रेजिनाल्ड यांना काँग्रेसने दारातच अडवून धरले व मोरेना रिबेलो यांना उमेदवारी जाहीर करून आलेक्स यांना जशासतसे उत्तर दिलेच शिवा जबरदस्त हादरा दिला.
आलेक्सच्या ऐवजी मोरेनो
कुडतरी मतदारसंघातून काँगेसने रिबेलो यांना उमेदवारी दिल्याने लॉरेन्स यांना धक्का बसला आहे. काँगेस पक्षात घरवापसी करून कुडतरीची उमेदवारी पुन्हा मिळण्याचे लॉरेन्स यांचे स्वप्न भंगले आहे.
पहिल्या यादीत होते आलेक्स
यापुर्वी काँगेस पक्षाने आपल्या पहिल्याच उमेदवारी यादीत कुडतरी मतदारसंघातून आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर केली होती. असे असतानाही लॉरेन्स यांनी काँगेसला रामराम ठोकत तृणमूल काँगेस पक्षाची वाट धरली आणि पक्षात सामील झाले. साधारण एक महिन्याने लॉरेन्स यांनी अलिकडेच तृणमूल पक्ष सोडला आणि ‘चुकलो माफ्ढ करा’ अशी भाषा वापरून गयावया करीत ते पुन्हा काँगेस पक्षात परतू पाहत होते. लॉरेन्स यांची ही खेळी काँगेसने धुळीस मिळविली असून उमेदवारी नाकारून पक्षात येऊ नका, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
लॉरेन्स यांच्यासमोर आप की भाजप?
काँगेस पक्षाच्या या निर्णयामुळे लॉरेन्स यांची आता कोंडी झाली असून त्यांना आता ‘आप किंवा भाजप’ मध्ये सामील होण्याचा पर्याय उरला आहे. लॉरेन्स आता पुढे कोणता पवित्रा घेतात की अपक्ष निवडणूक लढवतात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
काँग्रेस उमेदवार
- कुडतरी-मोरेनो रिबेलो
- शिवोली-डिलायला लोबो
- साळगाव-केदार नाईक
- हळदोणे-ऍड. कार्लूस परेरा
- प्रियोळ-डॉ. दिनेश जल्मी









