साहित्य : सारणः 6 मध्यम बटाटे, 2 चमचे तळलेला कांदा, 2 चमचे कोथिंबीर, पाव चमचा लाल तिखट पावडर, पाव चमचा मीठ, 1 चमचा बेदाणे, 1 चमचा बदाम काप, तेल तळण्यासाठी, ग्रेव्हीः 50 ग्रॅम बटर, 2 कांदे, 10 काजू, 4 टोमॅटो, चवीपुरते मीठ, 2 लाल सुक्या मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा कसूरीमेथी, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, पाव वाटी क्रीम, पोटलीः 4 वेलची, 4 लवंग, 2 तमालपत्र, 1 दालचिनी तुकडा
कृती : बटाटे सोलून धुवून दोन भाग करावेत. सुरीने बटाटय़ाच्या मधोमध वाटीप्रमाणे खोलगट भाग करून गरम तेलात तळावा. त्याच तेलात बटाटय़ाचा उरलेला भाग तळून कुस्करून सारणाचे इतर साहित्य मिक्स करावे. हे सारण बटाटा वाटीत भरावे. सुती कापडात पोटलीचे साहित्य घालून पोटली बनवावी. गरम बटरमध्ये काजू, पोटली, ग्रेव्हीचे इतर साहित्य व पाणी घालून शिजवावे. गार करून त्याची पेस्ट बनवावी. गरम बटरमध्ये आलं-लसूण पेस्ट टाकावी. त्यात कांदा-टोमॅटो पेस्ट व गरम मसाला पावडर टाकून शिजवावे. आता त्यात सारण भरलेले बटाटे ठेवून गरम करावे. वरून कसूरीमेथी आणि क्रीम घालून तयार बटाटा मखनी जेवणासोबत द्या.