न.प. मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांना दिले निवेदन : नागरिकांच्या पैशाचा गैरवापर न करण्याची केली मागणी
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी नगर परिषदेच्या नळपाणी योजनेत सरकारी जागा असताना सुद्धा गेल्यावर्षी परटवणे आलिमवाडी येथील 17 लाखाला खरेदी केलेली 3.88 गुंठे जागा 1 कोटी 27 लाख एवढय़ा रकमेला विकत घेण्याचा घाट शिवसेनेच्या सत्ताधारी नगरसेवकांनी घातला आहे. नागरीकांच्या कररुपी पैशाचा गैरवापर करु नये. अवाजवी दराने जनतेच्या पैशाने जागा खरेदी करण्यास रत्नागिरी शहर भाजपाचा प्रखर विरोध दर्शवण्यात आला.
त्यासंदर्भात नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांना शहर भाजपातर्फे निवेदन देण्यात आले आहे. रत्नागिरी नगर परिषदेमार्फत परटवणे आलिमवाडी येथे उभारण्यात येणाऱया वादातीत पाणी टाकीच्या जमिन खरेदीसाठी होणारा खर्च 1 कोटी 27 लाख 32 हजार आहे. त्याला टाकावी लागणारी पाईपलाईन असा एकूण खर्च 4 कोटी 27 लाख 32 हजार एवढा आहे. या खर्चाचा आर्थिक भार नाहक नगर परिषदेवर पडून सर्व खर्च जनतेने भरलेल्या विविध करांमधून होणार आहे. याचा गांभिर्याने विचार करून चुकीची कार्यवाही किंवा पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. तेथील 3.88 गुंठे जागेसाठी 1 कोटी 27 लाख मोजण्याची गरज नसल्याचे म्हणणे आहे. त्यासंदर्भात शहरातील नागरिकांच्या सहय़ांचे निवेदन मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांना देण्यात आले. न प सर्वसाधारण सभेपुर्वी अशी हजारो सह्यांची निवेदन सादर केली जाणार आहेत. सोमवारी यासंदर्भात निवेदन देताना शहर अध्यक्ष सचिन उर्फ अण्णा करमरकर, शहर प्रभारी भैय्या मलुष्टे, राजू कीर, सुप्रिया रसाळ, प्राजक्ता रूमडे, आणि भाजपा कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









