प्रतिनिधी / कुरुंदवाड
आलास ता. शिरोळ येथील एका घरातून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या चोरट्यास कुरुंदवाड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 9 तोळ्याचे सोन्याचे दागिने, चारचाकी वाहन असा 8 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सतीश सावंत (रा.शिरोळ) असे चोरट्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद दिपाली दत्तात्रय कोळी (रा. आलास. ता.शिरोळ, मूळ रा. सांगली) यांनी येथील पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की 3 तारखेला दिपाली कोळी ह्या आपल्या कुटुंबीयासह कर्नाटक राज्यात देवदर्शनास जाण्यासाठी सतीश सावंत यांची चारचाकी कार भाड्याने घेतली होती. सावंत हा चालक म्हणून आला होता. दरम्यान दिपाली कोळी यांनी आपले दागिने पर्समध्ये ठेवले होते. देवदर्शन करून आल्यानंतर पर्स मधील दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले असता दिपाली कोळी यांनी येथील पोलिसात फिर्याद दिली होती. पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ विजय घाटगे, प्रकाश हंकारे यांनी या चोरी प्रकरणी तपासाची यंत्रणा गतिमान करून चालक सतीश सावंत याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.
यावेळी सावंत याच्याकडून 4 तोळ्यांच्या सोन्याच्या 2 पाटल्या, 4 तोळ्यांच्या सोन्याचे 4 बिलवर, अर्ध्या तोळ्यांच्या सोन्याच्या 2 अंगठ्या, 5 ग्रामचे सोन्याचे मनी गंठण हार, चांदीचे पैंजण असे 2 लाख 87 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने, चोरीत वापरलेली कार असा एकूण 8लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान या चोरीतील संशयित आरोपी सतीश सावंत यास येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 13 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.