सारेगमप लिटिल चॅम्पमुळे गायिका अशी ओळख मिळालेली आर्या आंबेकर संगीत क्षेत्रातील एका प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत असल्याची चर्चा होत होती. परंतु ही चर्चा म्हणजे निव्वळ अफवा असल्याचा खुलासा करत आर्याने या विषयाला पूर्णविराम दिला आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमातून घराघरात एक गुणी गायिका म्हणून आर्याची ओळख झाली आहे. संगीताबरोबरच आर्याने ‘ती सध्या काय करते’ या सिनेमातून अभिनयाच्या क्षेत्रातही पदार्पण केल्याने तिची लोकप्रियता वाढली. गोड गळा आणि सोज्वळ सौंदर्यामुळे आर्याने अनेकांना भुरळ घातली आहे. ज्या कार्यक्रमातून आर्याला गायिका म्हणून ओळख मिळाली त्याच कार्यक्रमात आर्या आता परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. तिथे देखील आपल्या सांगितीक ज्ञानाचा फायदा नवीन पिढीतील चिमुरडय़ांना करून देत आहे.
सोशल मीडियावर सातत्याने आर्या आंबेकर एका प्रसिद्ध संगीतकार आणि गायकाला डेट करत असल्याची बातमी चर्चेत आली. त्यामुळे हे नेमके काय आहे, असे म्हणत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. याबाबत सातत्याने उलटसुलट चर्चा होत होत्या. सुरुवातीला आर्याने या चर्चांकडे कानाडोळा केला परंतु पुन्हा ही चर्चा सतत होऊ लागल्याने अखेर आर्याने याबाबत मौन सोडत खुलासा करणारी पोस्ट शेअर केली.
आर्याने पोस्टमध्ये या चर्चेबरोबरच अन्य काही गोष्टींचाही खुलासा केला आहे. यामध्ये तिने लिहिले आहे, ‘प्रारंभी मी या सगळ्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले होतं. मात्र माझ्या प्रश्नोत्तरांच्या सेशनमध्ये याबाबतच काही प्रश्न विचारले होते. त्यामुळे या गोष्टींचा खुलासा करण्याचे ठरवले आहे. खुलाशात म्हटले आहे की, ‘गेल्या 12 वर्षांपासून कोणतीही टॅलेंट एजन्सी मला मॅनेज करत नाही. इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजवरील माझे फॉलोअर्स ऑर्गेनिक आहेत. यूटय़ुबवरील सबक्रायबर आणि व्हूजदेखील ऑर्गेनिक आहेत. आर्याने तिच्या पोस्टमध्ये सोशल मीडियावर तिला मिळणाऱया प्रेमाबद्दल चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत. एका प्रसिद्ध गायक आणि संगीतकाराला मी डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ही अफवा मी अनेक दिवसांपासून सातत्याने ऐकत आहे. परंतु मी सर्वांना स्पष्टपणे सांगू इच्छिते की ते माझे मार्गदर्शक आहेत. काहीही अफवा असल्या तरी मी कायम त्यांचा आदर केला आहे आणि कायम करत राहीन…









