वृत्तसंस्था/ येरेवान
1 आठवडय़ापासून सुरू असलेल्या युद्धादरम्यान आर्मेनियाने रविवारी अजरबैजानच्या नागरी भागांवर अग्निबाण डागले आहेत. देशातील दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या गंजावर झालेल्या या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. अग्निबाण हल्ल्याप्रकरणी अजरबैजानने नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही थेट आर्मेनियाच्या सैन्यतळांना लक्ष्य करू असे विधान अजरबैजानच्या अध्यक्षांचे सल्लागार हिकमत हजियेव यांनी केले आहे.
याचदरम्यान आर्मेनियाने अजरबैजानवर अग्निबाण हल्ला केल्याचा आरोप नाकारला आहे. अजरबैजान अफवा पसरवित असल्याचा दावा आर्मेनियाने केला आहे.
गंजा शहरातील एका वायुतळाला लक्ष्य करत हल्ला केला होता. सर्वसामान्यांना नुकसान होऊ नये म्हणून हल्ले रोखण्यात आल्याचे नागोर्नो-काराबाखच्या गटांनी म्हटले आहे. अजरबैजानच्या नागरी भागांवर झालेल्या हल्ल्याची तुर्कस्तानने निंदा केली आहे.
लढाईचे कारण
माजी सोव्हियत संघाच्या या दोन्ही देशांदरम्यान नागोर्नो-काराबाख भागावरून दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा भाग अजरबैजानचा हिस्सा मानला जातो. परंतु आर्मेनियाने यावर दावा मांडला आहे. 1994 च्या लढाईपासून हा भाग अजरबैजानच्या नियंत्रणात नाही. या भागात दोन्ही देशांचे सैनिक तैनात आहेत. सुमारे 4,440 किलोमीटरमध्ये फैलावलेल्या नागोर्नो-काराबाखचा बहुतांश हिस्सा डेंगराळ आहे. मागील वर्षी जुलैमध्येही दोन्ही देशांदरम्यान यावरून संघर्ष झाला होता आणि यात 16 जण मारले गेले होते.









