तुर्कस्तानला मोठा धक्का – बायडेन प्रशासनाचा मोठा निर्णय
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेने तुर्कस्तानला मोठा धक्का देत 20 व्या शतकात ऑटोमन साम्राज्याकडून झालेल्या लाखो आर्मेनियन लोकांच्या कत्तलीला नरसंहार ठरविले आहे. तुर्कस्तानचा घनिष्ठ सहकारी असलेला अमेरिका कित्येक दशकांपासून या कत्तलीप्रकरणी मौन बाळगून होता. अध्यक्ष जो बायडेन यांच्या या कठोर प्रतिक्रियेमुळे नाटोतील एकमेव मुस्लीम सहकारी देश तुर्कस्तानला मोठा झटका बसला ाअहे. 1915 मध्ये सुरू झालेल्या या नरसंहाराची निंदा करण्याचे आश्वासन बायडेन यांनी प्रचारादरम्यान दिले होते. आर्मेनियन वंशाच्या लोकांकडून पाळण्यात येणाऱया वार्षिक स्मृतीदिनी बायडेन यांनी या आश्वासनाची पूर्तता केली आहे.
यापूर्वीचे अमेरिकेचे अध्यक्ष मृत आर्मेनियन लोकांना श्रद्धांजली वाहत होते, पण ऑटोमन साम्राज्याबद्दल अवाक्षरही काढत नव्हते. बायडेन यांनी हे सत्र संपुष्टात आणत शनिवारी हत्यांसाठी कठोर शब्दांचा वापर करत त्याला नरसंहाराची उपमा दिली आहे. एका अनुमानानुसार 20 व्या शतकाच्या प्रारंभीच्या दशकांमध्ये या नरसंहारात सुमारे 15 लाख आर्मेनियन लोकांची कत्तल करण्यात आली होती आणि 20 लाख लोकांना विस्थापित करण्यात आले होते.
तुर्कस्तानच्या विनवणीला धुडकावले
बायडेन यांच्या घोषणेच्या काही तासांपूर्वी तुर्कस्तानचे अध्यक्ष रेचप तैयप एर्दोगान यांनी फोनवरून विनणी केली होती. या फोन कॉलदरम्यान बायडेन यांनी आर्मेनियन नरसंहाराबद्दल बोलणार असल्याचे एर्दोगान यांना स्पष्ट शब्दांत सांगितले होते.
15 लाख आर्मेनियनांची कत्तल
आर्मेनिया आणि अन्य इतिहासकारांनुसार 1915मध्ये ऑटोमन सैन्याने अत्यंत क्रूरपणे सुमारे 15 लाख लोकांची हत्या केली होती. तुर्कस्तान सातत्याने हा आरोप फेटाळून लावत आला आहे. तर यामुळे आर्मेनिया आणि तुर्कस्तानच्या संबंधांमध्ये तणाव राहिला आहे.
तुर्कस्तानने नाही मागितली माफी
तुर्कस्तानने आजपर्यंत आर्मेनियातील लोकांवर केलेल्या अत्याचाराप्रकरणी जाहीरपणे माफी मागितलेली नाही. याच्या उलट तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगान यांनी अलिकडेच आर्मेनियाच्या विरोधातील युद्धात अजरबैजानला पाठिंबा दिला होता. आर्मेनियाच्या सैन्याला मोठे नुकसान घडविणारी सामग्री तुर्कस्तानने अजरबैजानला पुरविली होती.
अमेरिकेच्या राजदूताला पाचारण
बायडेन यांच्या घोषणेमुळे संतप्त तुर्कस्तानच्या विदेश मंत्रालयाने अंकारामधील अमेरिकचे राजदूत डेव्हिड सॅटरफिल्ड यांना पाचारण केले आहे. आर्मेनियात नरसंहार झाल्याचे म्हणणाऱया बायडेन यांच्याकडे कुठलाच कायदेशीर पुरावा नाही. बायडेन यांच्या निर्णयामुळे द्विपक्षीय संबंधांना झालेले नुकसान भरून काढणे अवघड ठरल्याचे तुर्कस्तानचे उपविदेशमंत्री सेदात ओनल यांनी अमेरिकेच्या राजदूतांना सांगितले आहे.
अमेरिकेचे दूतावास बंद
बायडेन यांच्या घोषणेनंतर अमेरिकेच्या दूतावासांसमोर निदर्शने होण्याची भीती आहे. याचमुळे अमेरिकेने पाऊल उचलत अंकारा, इस्तंबूल आणि अडाना येथील दूतावास 26 आणि 27 एप्रिल रोजी बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. यादरम्यान दूतावासात कुठलीच सेवा उपलब्ध होणार नाही.









