युवकांची राज्य सरकारकडे मागणी : शहराच्या विविध भागांतून काढला मोर्चा
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे मागील दोन वर्षात आर्मी भरती झालेली नाही. ज्यांची मेडिकल तपासणी झाली आहे परंतु अद्याप लेखी परीक्षा झालेली नाही. सध्या यातील बऱयाच मुलांचे वय संपले असून, त्यांना परीक्षेस पात्र राहता येणार नाही. त्यामुळे कर्नाटक सरकारने आर्मी भरतीमध्ये वयात शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आर्मी भरतीसाठी प्रयत्न करणाऱया युवकांमधून होत आहे.
रविवारी कित्तूर चन्नम्मा चौकापासून शहराच्या विविध भागात फिरून तरुणांनी मोर्चा काढला. दोन वर्षे भरती झाली नसल्याने युवकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. आता वय वाढले असल्याने ते आर्मी भरतीसाठी पात्र होणार नाहीत. देशातील इतर राज्य सरकार आर्मी भरतीसाठी केंद्र सरकारवर दबाव आणत असताना कर्नाटक राज्य सरकार मात्र कोणतीच हालचाल करीत नसल्याने युवकांनी नाराजी व्यक्त केली. कोरोनानंतर इतर सर्व परीक्षा सुरळीत पद्धतीने घेतल्या जात असल्याने आर्मी भरतीसाठी विलंब का होत आहे, असा प्रश्न तरुणाई उपस्थित करीत आहे. त्यामुळे लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी युवकांनी केली.









