पावसाची रिपरिप सुरूच : भातपीक लागवडीला पोषक वातावरण : शेतकऱयांना दिलासा
प्रतिनिधी /बेळगाव
मान्सूनला जोरदार सुरुवात झाली. दमदार मान्सूनमुळे नुकत्याच उगवून आलेल्या पिकाला फटका बसला. त्यानंतर शेतकऱयांनी दुबार पेरणी केली. मात्र पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे बळीराजा अडचणीत आला होता. आर्द्रा, पुनर्वसू ही दोन्ही नक्षत्रे कोरडी गेली. त्यामुळे शेतकरी चिंतेत असताना पुष्य नक्षत्राने मात्र दिलासा दिला. गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत तर इतर वेळी पावसाची रिपरिप सुरूच आहे. या पावसामुळे हवेमध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. दिवसभरात 4.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती. त्यानंतर मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी पावसाच्या अधूनमधून जोराच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे शहरातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. पावसामुळे साऱयांनाच छत्र्या, रेनकोट यांचा आधार घ्यावा लागला होता.
बुधवारी बकरी-ईदमुळे सरकारी कार्यालयांना सुटी होती. शहरातील सखल भागामध्ये काही ठिकाणी पाणी साचून होते. स्मार्ट सिटीची कामे अर्धवट असल्याने काही ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले होते. काही ठिकाणी दलदलही झाली होती. त्यामधून पादचाऱयांना वाट काढावी लागत होती. स्मार्ट सिटीची अनेक कामे अर्धवट आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱया नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे रेनकोटशिवाय बाहेर पडता येत नव्हते. फेरीवाले, बैठे व्यापारी यांना काहीसा त्रास सहन करावा लागला. या पावसामुळे भात लागवडीला मोठा फायदा झाला आहे.









