बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना साथीमुळे देश आर्थिक संकटात आहे. या कोरोना साथीसारख्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने आपल्या ३२ मंत्री आणि २८ खासदारांसाठी १३.८ कोटी रुपयांच्या नवीन इनोव्हा कार खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.
कार्मिक व प्रशासकीय सेवा विभागाने (डीपीआरए) जारी केलेल्या आदेशानुसार, राज्यातील मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने मंत्री आणि खासदारांच्या वाहनांच्या खरेदीसाठी २ लाखांपर्यंत भत्ता वाढविला आहे.
सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री व जेडीएस नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी कोरोनामुळे असलेला महागाईमुळे होणार्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय एका वर्षासाठी पुढे ढकलला गेला असता. सरकारने आधीच सुमारे८५ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.
नियमांनुसार मंत्री किंवा निवडलेले प्रतिनिधी ती कार एक लाख किमी धावल्यानंतर किंवा खरेदीनंतर सात वर्षांनी बदलू शकतात. त्यानंतर, ही कार सहसा जिल्हा मुख्यालयात तैनात असते आणि व्हीआयपींच्या त्यांच्या प्रवासाच्या वेळी वापरली जाते.
या वर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी टोयोटा फॉर्च्युनर एक लक्झरी एसयूव्ही कार खरेदी करणार, ज्याची किंमत अंदाजे ३३ लाख रुपये आहे. तर १७ टोयोटा इनोव्हा कार खासदारांसाठी खरेदी करण्यात येणार आहे. त्यांची किमंत २३ लाख रुपये आहे.









